कल्याण – एक पक्ष, गटाचे नगरसेवक निवडून येतील अशा पध्दतीने कल्याण डोंबिवली पालिकेच्या १२२ प्रभागांची चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे ३१ प्रभागांमध्ये रचना करण्यात आली आहे. एक पक्ष, एक गट आणि एका विचाराचे सदस्य या चार सदस्यीय प्रभाग रचनेत आपले स्थान टिकून ठेवणार आहेत. त्यामुळे यापूर्वी एकला चलो रेचा नारा देत प्रभागांमधून अपक्ष म्हणून निवडून येणारे आणि नंतर पालिकेतील सत्ता स्थापनेच्यावेळी आपले ‘महत्व’ वाढविणारे अपक्ष दादा-भाई यांची मक्तेदारी चार सदस्य प्रभाग रचनेत संपुष्टात येणार आहे, अशी माहिती राजकीय क्षेत्रातील एका जाणकाराने दिली.

आतापर्यंत कोणत्याही पक्षात सहभागी न होता अपक्ष म्हणून निवडून येऊन कल्याण डोंबिवली पालिकेतील सत्ता स्थापनेच्या वेळी काही अपक्ष नगरसेवक आपली गडगंज आर्थिक गणिते साध्य करून सत्ता स्थानी बसणाऱ्या पक्ष, युतीला पाठिंबा देत होते. पालिकेत ज्या वेळी बहुमताचा मतदानाचा विषय येत होते. त्यावेळीही या अपक्ष नगरसेवकांचा भाव वधारत होता. मागील पंचविस वर्षाच्या कालावधीत अशा अनेक अपक्षांनी यापूर्वी पालिकेत मौजमजा केली. असे मौजमजा करणारे अपक्ष आता मात्र चार सदस्य प्रभाग रचनेत बाद होण्याची चिन्हे आहेत.

नोव्हेंबर २०२० मध्ये कल्याण डोंबिवली पालिकेतील लोकप्रतिनिधी राजवटीची मुदत संपली. दरम्यानच्या काळात करोना महासाथ सुरू होती. या कालावधीत पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी अनेक नवख्या, उमद्या, हरहु्न्नरी तरूणांनी करोना महासाथीच्या काळात घरोघरी किराणा, बटाटे, कांदे, भाजीपाला, मुखपट्टी असे अनेक उपक्रम राबवून आपले स्थान लोकांच्या हदयात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक समाजसेवक तरूण आता प्रभागांमध्ये स्वसामर्थ्यावर काही पक्षीय आधार घेत दिखाव्याच्या लोकसेवेत व्यस्त आहेत. आपणास आपल्या लोकांमधील कामाच्या बळावर नक्कीच नगरसेवक म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेत निवडून जाण्यासाठी ताकद मिळेल असे या होतकरू इच्छुक नगरसेवकांना वाटते.

नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी सामाजिक कार्याबरोबर पैशांची बेगमी पण लागणार आहे. म्हणून अनेक होतकरू तरूणांनी बेकायदा चाळी, इमारतींच्या माध्यमातून कमाई करून ती पुंजी पालिका निवडणुकीसाठी सज्ज करून ठेवली आहे. यामधील बहुतांशी तरूण हे आपण नगरसेवक होणारच या विचारातून आतापासून कामाला लागले आहेत. या होतकरू इच्छुक भावी लोकप्रतिनिधींनी अधिक संख्येने डोंबिवली, कल्याण परिसरात, खाडी किनारी भागात अधिक संख्येने बेकायदा चाळींची उभारणी केली आहे. त्यामुळे या इच्छुक नगरसेवकांना शहरात ‘चाॅल्डर’ (बेकायदा चाळी बांधणारा) म्हणूनही ओळखले जाते.

मागील २५ वर्षाच्या कालावधीत काही ठराविक प्रभागांमधून अपक्ष म्हणून निवडून येणारे यापूर्वीचे नगरसेवक वतनदारासारखे पालिकेत मिरवत होते. आता जुन्या माजी अपक्ष नगरसेवकांचीही चार सदस्य प्रभाग रचनेमुळे कोंडी झाली आहे. जुनेजाणते अपक्ष नगरसेवक, नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असलेले नवखे दादा-भाई चार सदस्य प्रभाग रचनेत टिकाव लागणार नाही या विचारातून इतर पक्षांचे झेंडे हातात घेण्यासाठी सरसावत असल्याचे चित्र आहेत. यामध्ये जुन्या जाणत्या अपक्षांचीही भर आहे.