अंबरनाथ : ताहुलीच्या डोंगरावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चौघा जणांना जंगलाचा फेरा पडला आणि ते सर्व त्यात भरकटले. त्यांनी सतर्कता दाखवत ११२ क्रमांकावर संपर्क साधून आपण हरवल्याची माहिती दिली. हिललाईन पोलिसांच्या नेवाळी चौकीतील पोलिसांनी तात्काळ या पर्यटकांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पाच तास सलग राबवलेल्या शोध मोहिमेनंतर या चौघांना शोधण्यात यश आले. याबद्दल पोलिसांचे कौतुक केले जाते आहे.
ठाणे जिल्हा निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील गड, डोंगर, जंगलात फेरफटका मारण्यासाठी अनेक पर्यटक आणि गिर्यारोहक येत असतात. अनेक नद्या, कुंड, धबधब्यांचा आनंद घेण्यासाठीही पर्यटक ठाणे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी हजेरी लावतात. त्यामुळे काही ठिकाणी अप्रिय घटना घडतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात जिल्हा प्रशासन सातत्याने अशा पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू करत आहे. मात्र त्यानंतरही पर्यटकांचा ओढा कमी झालेला नाही. तसेच काही अतिउत्साह पर्यटकही कोणत्याही माहितीशिवाय जंगल, गडांवर हरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मंगळवारी मुंबईच्या दादर परिसरातील चार तरुण ताहुली डोंगरावर पर्यटनासाठी आले होते. त्यांनी सकाळी ताहुली डोंगरावर जाण्यासाठी प्रवास सुरू केला. मात्र काही अंतरावर गेले असता घनदाट जंगलात ते वाट चुकले. त्यामुळे चौघांमध्ये घबराट पसरली. त्यांनी तात्काळ पोलीसांच्या ११२ क्रमांकावर संपर्क साधत मदत मागितली. त्यानंतर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांकडे ही तक्रार आली. त्यांनी तातडीने या पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातच पर्यटकांचा फोन खोल दरीत पडल्याने त्यांच्याशी संपर्क साधने देखील पोलिसांना अवघड झाले होते.
हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अंकुश सुरेवाड, पोलीस हवालदार संदीप मुसळे, नाईक प्रशांत पाटील यांनी सुमारे पाचपेक्षा अधिक तास डोंगरावर शोध मोहीम सुरू ठेवली. त्यानंतर अखेर मंगळवारी सायंकाळी उशिरा या चौघांचा शोध लागला. त्यांनंतर त्यांना सुरक्षितरित्या खाली उतरवत स्थानिक पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी अवघ्या काही वेळात शोध मोहीम हाती घेत चौघांना वाचवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जाते आहे.
यापूर्वीही पर्यटक भरकटले
ठाणे जिल्ह्यातील सिद्धगडावर अनेक गिर्यारोहक गिर्यारोहणासाठी जात असतात. मात्र अनेकदा गिर्यारोहकांना त्यांचा अतिउत्साह धोकादायक ठरतो. जून महिन्यात एका गिर्यारोहकाचा सिद्धगडावर दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याचा शोध लागण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. यापूर्वीही अनेक गिर्यारोहकांना प्रणाला मुकावे लागले होते.