बदलापूरः व्हाट्सअपवर बनावट ऍपच्या लिंक पाठवून तब्बल सहा लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथमध्ये एका व्यक्तीच्या मोबाईलवर युनियन बँक ऑफ इंडियाचे बोधचिन्ह असलेला संदेश आला होता. तर बदलापुरात परिवहन विभागाचे चलान पाठवून आर्थिक फसवणूूक करण्यात आली. नागरिकांना अशा बनावट संदेशांपासून संतर्क राहण्याची मागणी होते आहे.

अंबरनाथ पूर्वेत राहणाऱ्या एका व्यक्तीला त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर युनियन बँक ऑफ इंडीया या बॅकेचे बोधचिन्ह असलेला एक व्हाट्सप संदेश आला. त्यावरून बँकेचे ऍप चालू करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ४ लाख ९८ हजार ९९३ रूपये गेले. त्यांनी बॅंकेत माहिती घेतली असता त्यांच्या मोबाईवर आलेले ऍप बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर बदलापुरातील दुसऱ्या एका प्रकरणात तक्रारदार व्यक्तीच्या मोबाईवर परिवहन विभागाचे एक चलन आले. त्या माध्यमातून गुगल पेच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या खात्यातून १ लाख ८९ हजार रूपये वळवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार केली. याप्रकरणी राजा राम, शाबाझ खान, दिपक कुमार शॉ अशा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणानंतर ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बनावट व्हाट्सअप लिंक तसेच खोट्या खात्याच्या माध्यमातून नागरिकांना भुलवले जाते. मात्र अशा वेळी सतर्कता बाळगुनच व्यवहार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.