अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर राज्यमार्ग सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी दररोज कोंडीने भरलेला असते. सायंकाळी या रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या दररोजी कोंडीसदृश्य स्थिती निर्माण करते आहे. अशातच या मार्गावर लादी नाका, विमको नाका, मटका चौक परिसरात गणेश कला केंद्र आणि मखर विक्रीची दुकाने उभारण्यात आली आहेत. या भागात थेट राज्यमार्गावर आतापासूनच वाहने उभी राहू लागली आहेत. त्यामुळे ऐन गणेशोत्सापूर्वी येथे कोंडी होण्याची भीती वर्तवली जाते आहे. अंबरनाथ पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

कल्याण बदलापूर राज्यमार्ग हा सध्याच्या घडीला सर्वाधिक वर्दळीचा असा मार्ग आहे. या मार्गावर कुठेही कोणत्याही कारणामुळे कोंडी झाल्यास मोठा काळ कोंडीत अडकून पडावे लागते. या मार्गाला कोणताही पर्यायी मार्ग नाही. अंबरनाथ शहरातून या मार्गाने जाताना तीन ठिकाणी सिग्नलवर थांबावे लागते. त्यात मटका चौक, महात्मा गांधी शाळा, पोलिस ठाण्यासमोरील चौक, विमको नाका, त्यापुढील चौक, लादी नाका या भागात बेशिस्त वाहनचालक, रस्त्यावर केली जाणारी पार्किंग, हातगाड्या आणि अवजड वाहनांमुळे अनेकदा कोंडी होती. सायंकाळी या सर्व चौकांमध्ये वाहने वळण घेताना मोठा संघर्ष करावा लागतो. यातील सिग्नल असलेल्या चौकांतही बेशिस्त वाहनचालकांमुळे फटका बसतो.

या मार्गावरील रस्त्याच्या कडेला अनेक वाहने उभी केली जातात. त्यामुळे कोंडी होत असते. अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावर आलेल्या उमाकांत गायकवाड यांनी रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, अतिक्रमणे हटवत रस्ता मोकळा केला होता. मात्र गणेशोत्सवाच्या तोंडावर याच वर्दळीच्या चौकांमध्ये गणेश कला केंद्र आणि सजावट साहित्य, मखराची दुकाने उभी राहिली आहेत. या दुकानांच्या अवतीभवती आतापासूनच वाहनांची पार्कींग होऊ लागली आहे. मटका चौकात तर ऐन सिग्नलजवळ दोन दुकाने आहेत. येत्या काळात ऐन गणेशोत्सवापूर्वी येथे गणेशभक्त, त्यांच्या वाहनांची गर्दी होऊन कोंडी होऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच या मार्गावर विविध ठिकाणी असलेले खड्डे, अरूंद पट्टे, बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक संथगतीने होते. त्यात उत्सवकाळात कोंडी झाल्यास त्याचा नागरिकांना फटका बसू शकतो. त्यामुळे वाहनचालक चिंतेत आहेत.

पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष

अंबरनाथ नगरपालिकेने राज्य मार्गावर या दुकानांना उघडण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळते आहे. त्यावरून पालिकेतही एकमत नसल्याचे बोलले जाते.