बदलापूरः अंबरनाथ आणि बदलापूर शहरांच्या  घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्वाचा असलेला संयुक्त घनकचरा  प्रकल्प आर्थिक पातळीवर पोहोचला असतानाच या कचरा प्रकल्पात आता उल्हासनगर शहराचाही समावेश करण्यात आला आहे. सुमारे 500 टन क्षमता असलेल्या या प्रकल्पात कचरा देणाऱ्या शहराची प्रतिक्षा होती. उल्हासनगर शहराचा समावेश झाल्याने प्रकल्पासाठी पुरेसा कचरा आणि व्यवस्थापन खर्चात आर्थिक हातभार मिळणार आहे. उल्हासनगर शहरातून दररोज सुमारे 350 टन कचरा निर्माण होतो.

ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांचे घनकचरा व्यवस्थापन बिघडलेले आहे. त्यामुळे शहरांच्या कचराभूमी कचऱ्याने भरून वाहत आहेत. आधीच कचरा हा प्रश्न असताना आता कचराभूमीमुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातही तुलनेने लहान असलेल्या उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांचा कचरा प्रश्न गेल्या काही वर्षात गंभीर झाल्याचे दिसून आले आहे.जागा आणि प्रक्रियेअभावी उल्हासनगर शहरातील कचराभूमीचा आसपासच्या नागरिकांना त्रास होतो आहे. तर अंबरनाथ शहरातही हाच प्रश्न गंभीर बनला आहे. दोन्ही शहरांचे कचराभूमीचे प्रश्न हरीत लवादाच्या दारात पोहोचले आहेत. त्यापूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला  मंजुरी मिळाली होती. बदलापूर नगरपालिकेच्या सुमारे 24 एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे अंबरनाथ नगरपालिकेचा कचराभूमीचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पात कचरा वर्गीकरण करून त्यापासून कचऱ्यावर आधारीत उत्पादने तयार केली जाणार आहेत. त्यासाठी दररोज किमान 500 टन कचऱ्याची आवश्यकता आहे. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांचा एकत्रीत कचरा सुमारे 200 टन इतका आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी अधिकच्या कचऱ्याची आवश्यकता होती. आधीच कचरा प्रश्नावर त्रस्त असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या हे पत्थ्यावर पडले. नुकतेच उल्हासनगर महापालिकेने अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या संयुक्त कचरा प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात दररोज 350 टन कचरा तयार होतो. उल्हासनगरच्या उसाटणे येथील कचराभूमीचा प्रश्न सुटताना दिसत नाही. अशावेळी हा प्रकल्प लवकर सुरू झाल्यास उल्हासनगर महापालिका प्रशासनावरचे मोठे संकट दूर होणार आहे. उल्हासनगर महापालिका प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.