‘लोकसत्ता विश्लेषण’ उपक्रमाच्या उद्घाटनपर व्याख्यानात गिरीश कुबेर यांचे प्रतिपादन

‘व्यवस्थेतील त्रुटी मान्य करून त्या सुधारण्याचा शहाणपणा अमेरिकी लोकशाहीने नेहमीच दाखविला. आणि त्यामुळेच ती लोकशाही प्रगल्भ आणि सर्वसमावेशक झाली. अमेरिकेकडून आपण शिकण्यासारखे असेल, तर ते हेच..’ अशा शब्दांत अमेरिकी लोकशाही व्यवस्थेचे मोठेपण अधोरेखित करतानाच ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या जागतिक महासत्तेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा नेमका अन्वयार्थ उलगडून दाखविला.

केवळ अमेरिकेच्याच नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीबद्दल सर्वांच्याच मनात अनेक ग्रह, प्रश्न, शंका आहेत. त्यांचे निरसन तर कुबेर यांनी केलेच, परंतु त्या संदर्भातून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांचे वास्तववादी विश्लेषणही त्यांनी केले. निमित्त होते ‘लोकसत्ता विश्लेषण’ या व्याख्यानमालिकेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे. वाचकांना विविध विषयांचे सखोल आकलन व्हावे, त्यांच्यासमोर एखाद्या विषयाचे विविध पैलू  यावेत, या हेतूने ‘लोकसत्ता’ने हा व्याख्यान उपक्रम सुरू केला आहे. रविवारी मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात गिरीश कुबेर यांच्या अमेरिकी निवडणुकीचा अन्वयार्थ उलगडून दाखविणाऱ्या या व्याख्यानाने त्याचे उद्घाटन झाले. रविवार सकाळची वेळ असूनही या उपक्रमास ‘लोकसत्ता’च्या जाणत्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि भारत यांच्यातील लोकशाही व्यवस्थेच्या उदयाची तुलनात्मक माहिती देत कुबेर यांनी या व्याख्यानास प्रारंभ केला. ते म्हणाले, ‘अमेरिकेची लोकशाही राजवट ही जन्मजात आहे. ती सुरुवातीच्या काळातच प्रौढ आणि प्रगल्भ झाली. चांगली, बुद्धिमान माणसेच देशाचे भले करू शकतात, या स्वरूपाची तेथील मतदारांची मानसिकता आहे. सर्वात मोठय़ा लोकशाहीचा दावा आपण करत असलो, तरी अमेरिकेतील लोकशाही अधिक प्रगल्भ आणि प्रातिनिधीक आहे. तेथे उमेदवारही निवडणूक प्रक्रियेतून निवडले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही शासकीय यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो’.

वैचारिक मतभेदांचा संबंध शत्रुत्वाशी लावला जात नसल्यामुळे तेथे कट्टर विरोधकालाही सन्मान दिला जातो. वातावरणातील या मोकळेपणाचे आकर्षण तेथे जाणाऱ्या प्रत्येकाला असते. अमेरिकेमध्ये जाणाऱ्यांना रोजगार आणि आर्थिक प्रगती यांपेक्षा तेथील ही मोकळी व्यवस्था अधिक खुणावते, असे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदविले. या निवडणुकीतील प्रचाराच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी आघाडी घेतली होती. भारतामध्ये निवडणुकीच्या काळात मतदारांना डोळ्यासमोर ठेऊन असभ्य आणि बेताल वक्तव्य केली जातात. इतरांना ती घातक वाटत असली तरी ते उमेदवार त्यांच्या मतदारसंघासाठीच तो संदेश देत असतात. त्यामुळे अशी वक्तव्य करणारे त्यांच्या मतदारांसाठी नायक ठरतात. अमेरिकी निवडणुकीत सुरुवातीला ट्रम्प यांनी याच मार्गाचा अवलंब केला. परप्रांतीय विरुद्ध भूमिपुत्र अशा प्रकारच्या आर्थिक विचारांची मांडणी केली. यामुळे बेरोजगार वर्गामध्ये ट्रम्प नायक ठरू लागले होते. मात्र पुढे त्यांच्यातील दोष आणि उणिवांचे प्रकर्षांने दर्शन घडल्यामुळे त्यांच्या मताधिक्यावर परिणाम झाला. त्यामुळे हिलरी यांच्या जिंकण्याच्या शक्यता वाढल्या आहेत आणि ते अधिक चांगले आहे. मात्र तेथे कोणीही जिंकले तरी त्याने आपण हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण अमेरिका हा देश केवळ एकाच देशाचा मित्र असतो आणि तो म्हणजे अमेरिका, असे मतही कुबेर यांनी यावेळी व्यक्त केले.

अमेरिकी निवडणूक, तिच्या निकालाचे तेथील भारतीयांवर, भारतावर, तसेच जागतिक राजकारण आणि अर्थकारण यांवर होणाऱ्या परिणामांचे सखोल विश्लेषण करणाऱ्या या विचारगर्भ व्याख्यानानंतर वाचकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही गिरीश कुबेर यांनी मनमोकळी उत्तरे दिली.