डोंबिवली – डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील काटई येथील एका हाॅटेलमधील शुभमंगल कार्यालयात विवाह कार्यासाठी रविवारी बदलापूरहून आलेल्या एका महिलेच्या पिशवीतील पाच लाख १० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने व्हराडी म्हणून लग्नात आलेल्या एका भुरट्या चोराने चोरून नेले आहेत.

या चोरीप्रकरणी बदलापूर कात्रप भागातील रहिवासी असलेल्या गौरी चिकणे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी साडे नऊ ते सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान शिळफाटा रस्त्यावरील हाॅटेल कुशाला ग्रीन्स येथील शुभमंगल कार्यालयात वधू पक्षाच्या खोलीत हा प्रकार घडला आहे.

तक्रारदार गौरी चिकणे या आपल्या नातेवाईकाच्या एका लग्न समारंभासाठी रविवारी सकाळी काटई येथे आल्या होत्या. प्रवासात सोन्याचे दागिने घालणे योग्य नाही म्हणून त्यांनी स्वताचे दागिने एका पिशवीत ठेवले होते. शुभमंगल कार्यालयात गेल्यानंतर लग्न सोहळ्याला सुरूवात होण्यापूर्वी दागिने परिधान करू असा विचार त्यांनी केला होता.

विवाह सोहळ्याची लग्न घटिका जवळ येऊन लागल्याने त्यांनी वेशभूषा केल्यानंतर वधू पक्षाच्या खोलीत आपल्या ठेवलेल्या पिशवीतील दागिने शोधले. त्या पिशवीत दागिने ठेवलेला बटवा नव्हता. त्यांनी पिशवी उलटीपालटी केली. त्यात दागिने नव्हते. खोलीत, परिसरात तपासणी केली. त्यांना कोठेही दागिने आढळले नाहीत. पिशवी खोलीत ठेवताना पिशवीची साखळी बंद होती. पण दागिने काढण्यापूर्वी ती साखळी उघडी होती. त्यामुळे पाळत ठेऊन अज्ञात चोरट्याने आपल्या पिशवीतील सोन्याचे दागिने चोरून नेले असा संशय व्यक्त करत गौरी चिकणे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे याप्रकरणाचा तपास करत आहेत. अलीकडे लग्न सोहळ्यात व्हराडीच्या वेशात जाऊन काही चोरटे वधू, वर पक्षाच्या खोलीतील दागिने, रोख रक्कम, आहेर पाकिटांची चोरी करत असल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. अशाच पध्दतीने हा गुन्हा करण्यात आला असण्याचा संशय पोलिसांना आहे.