आपल्या विशिष्ट गुणांसाठी काही श्वान ओळखले जातात. काही शांत स्वभावाचे, काही रागीट तर काही उत्तम राखणदारी करणारे श्वान पाहायला मिळतात. श्वान प्रजातींमध्ये अतिशय चपळ असणारे ‘ग्रे हाऊंड’ आपल्या याच वैशिष्टय़ांमुळे लोकप्रिय आहेत. ताशी ४५ ते ७० किमी अंतर पार करणारे ‘ग्रे हाऊंड’ हे श्वान जगभरात प्रसिद्ध आहेत. या श्वानांना एखाद्या धावत्या गोष्टीचा मागोवा घेण्याची सवय असते. वेगाने धाव घेत आपले लक्ष्य साध्य करण्यात ‘ग्रे हाऊंड’ तरबेज असतात. मूळचे ब्रिटनमधील असलेले ‘ग्रे हाऊंड’ अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात शिकारीसाठी वापरले जायचे. इजिप्तमध्ये चार हजार वर्षांपूर्वीचे ‘ग्रे हाऊंडचे’ काही संदर्भ आढळतात. ‘ग्रे हाऊंड’ इजिप्तमधील ‘सालुकी’ आणि ‘स्लुगी’ या श्वान प्रजातींसारखे दिसतात. अठराव्या शतकात ब्रिटनमध्ये ‘ग्रे हाउंड’ श्वान ब्रीड आणले गेले. एकोणिसाव्या शतकात लंडनमध्ये या श्वानांची नोंदणी झाली. अमेरिकेत हे श्वान गेल्यावर जगभरात प्रसार झाला. भारतात ग्रे हाउंड हे श्वान ब्रिटिशांनी आणले. पंजाबमध्ये ‘ग्रे हाऊंडचा’ मोठय़ा प्रमाणात प्रसार झाला. पंजाबमध्ये आढळणाऱ्या मोठय़ा शेतात ससे, लहान प्राण्यांच्या शिकारीसाठी ग्रे हाऊंड वापरले जायचे. सध्या ग्रे हाऊंड श्वानांचा उपयोग शर्यतीसाठी केला जातो. अमेरिका आणि पंजाबमध्ये आजही ग्रे हाऊंड श्वानांच्या शर्यती पाहण्यासाठी गर्दी जमते. पंजाबमधून दक्षिण महाराष्ट्रात सांगली, सातारा, कऱ्हाड या ठिकाणी ग्रे हाऊंड श्वानांचा प्रसार झाला. शाहू महाराजांकडे असणाऱ्या ‘कारवान हाऊंड’, ‘मुधोळ हाऊंड’ श्वानांप्रमाणेच ‘ग्रे हाऊंडही’ अस्तित्वात होते. या श्वानांचा वेग अधिक वाढवण्यासाठी भारतात ‘कारवान हाऊंड’ आणि ‘ग्रे हाऊंड’ हे ब्रीड एकत्रित करून संमिश्र ब्रीड तयार केले.
स्वाभिमानी ग्रे हाऊंड
ग्रे हाऊंड श्वानांचा स्वभाव शांत असला तरी विशिष्ट थाटात राहण्याची त्यांची सवय असते. याच कारणामुळे घरात पाळताना या श्वानांसाठी स्वतंत्र मोकळी जागा लागते. इतर श्वानांप्रमाणे हे श्वान दंगा करत नाहीत. खोडकर स्वभाव नसल्याने घरात माणसांच्या सहवासात असले तरी ग्रे हाऊंड स्वत:च्या विश्वात रमणे पसंत करतात. या श्वानांना विनाकारण त्रास दिलेला सहन होत नाही. याउलट घरातील व्यक्तीकडून या श्वानांना मान हवा असतो. जेवढा मान या श्वानांना दिला जाईल तेवढा घरातील व्यक्तींचा मान हे श्वान राखतात.
आहार हेच दीर्घ आयुष्याचे रहस्य
शर्यतीमध्ये असताना भरपूर आणि पौष्टिक आहार या श्वानांना द्यावा लागतो. उच्च प्रथिने असलेला परिपूर्ण आहार खास ग्रे हाऊंड साठी बनवला जातो. ज्याप्रमाणे घोडय़ांच्या आहाराची काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे ग्रे हाऊंडच्या आहाराविषयी काळजी घेतली जाते. उत्तम आहार दिल्यास शर्यतीचे आणि शर्यतीनंतरचे उर्वरित आयुष्य चांगले राहते.
दररोज धावण्याचा व्यायाम
धावणे हेच वैशिष्टय़ असल्याने दररोज ग्रे हाऊंड श्वानांना पंधरा ते वीस मोठय़ा धावा घेण्याचा व्यायाम व्हावा लागतो. वासावरून शिकार न पकडता हे श्वान नजरेवरून आपली शिकार पकडतात. म्हणूनच यांना ‘साइट हाऊंड’ असेही म्हणतात. धावण्यासाठी बाहेर फिरायला नेल्यावर मात्र बंदिस्त मैदानात धावण्यासाठी उपयुक्त ठरते. धावण्यामुळे या श्वानांच्या सांध्याना इजा होण्याची शक्यता असते. त्वचा नाजूक असल्याने या श्वानांना ठेवण्याची जागा साफ आणि स्वच्छ ठेवावी लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शर्यतीच्या निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य सुखकर
पूर्वीच्या काळी परदेशात शर्यतीसाठी वापरले जाणारे ग्रे हाऊंड श्वानांना त्यांची शर्यतीची गुणवत्ता संपल्यावर मारले जायचे. मात्र अलीकडे अशाप्रकारे क्रूर कृत्य न करता शर्यतीतून निवृत्त झालेल्या श्वानांसाठी परदेशात काही संस्था काम करतात. शर्यतीनंतरचे या श्वानांचे उर्वरित आयुष्य या संस्थांमध्ये सुखकर होते. आहार आणि इतर काळजी घेत या श्वानांचे शर्यतीनंतरच्या आयुष्याची देखभाल केली जाते. काही लोक शर्यतीतून निवृत्त झालेले ग्रे हाऊंड घरात पालनासाठी वापरतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greyhound dog information
First published on: 10-05-2016 at 04:33 IST