टँकरमाफियांमुळे भाईंदरजवळील आदिवासी पाडय़ातील हातपंप बंद; आदिवासींची गुजराण आता टँकरच्या पाण्यावर
पिण्याच्या पाण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून नळजोडणी नसल्याने हातपंप हाच भाईंदरजवळील आदिवासी पाडय़ांचा पाण्याचा स्रोत. मात्र टँकरमाफियांकडून बेसुमार उपसा होत असल्याने भूगर्भातील पाणी कमी झाले असून त्याचा परिणाम हातपंपांच्या पाण्यावरही झाला आहे. हातपंपांनाही पाणी नसल्याने येथील आदिवासी समाजाने चिंता व्यक्त केली. आता दोन-अडीच महिने नगरपालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करेल, त्यावर गुजराण करावी लागणार आहे, अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत माशाचा पाडा, दाचकुल पाडा, मीनाक्षी नगर आदी आदिवासी पाडे आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी गेली नसल्याने पाडय़ावरच्या आदिवासींना नळजोडणी नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून पालिकेने पाडय़ांवर हातपंप बसवून दिले. हातपंपाने उपसा करून आदिवासी महिला डोक्यावरून पाणी वाहून नेतात. वर्षांतले आठ महिने पाणी पुरते मात्र उन्हाळा सुरू झाला की या पंपाचे पाणी आटायला सुरुवात होते. सध्या हे पंप कोरडेठाक पडले आहेत. मिळाला तर कसाबसा एखादा हंडा पाणी मिळते, अशी परिस्थिती आहे. दरवर्षी या काळात ही समस्या उद्भवत असल्याने महापालिकेकडून टँकरने पाणी पुरविण्यात येते. परंतु हे टँकरही अनेकदा वेळेवर येत नसल्याने आदिवासींचे पाण्यावाचून हाल होतात.
ही पाणीटंचाई मात्र निसर्गनिर्मित नसून पाण्याचा अतिरेकी उपसा होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. या आदिवासी पाडय़ांच्या आसपास मोठय़ा प्रमाणावर कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. कूपनलिकांवर इलेक्ट्रिक पंप बसवून त्यातील पाणी टँकरमध्ये भरून विकले जात आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात टँकरला प्रचंड मागणी असल्याचे पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी टँकरमाफिया पाण्याचा बेसुमार उपसा करत आहेत आणि त्यावर कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नाही. दररोज होणाऱ्या बेसुमार उपशामुळे जमिनीची पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत असल्याने त्याचा थेट फटका आदिवासी पाडय़ांना बसत आहे.
खोदण्यात आलेल्या कूपनलिका खासगी जागेमध्ये असल्याने त्यावर कारवाई करण्यात अडचणी आहेत. दरवर्षी या आदिवासी पाडय़ांमध्ये महानगरपालिका टँकरने पाणी पुरवते. यासाठी प्रत्येक पाडय़ावर दहा हजार लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. या टाक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यात येते, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hand pumps not working in tribal colony near bhayander
First published on: 26-04-2016 at 04:02 IST