ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांना फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचवेळी त्यांनी ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षा संघटनेच्या कार्यालयाची तोडफोड केली. कारवाईदरम्यान त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे.
ठाण्याचे उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात पालिकेत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच ठाणे रेल्वेस्थानक परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. त्या अनुषंगाने पालिकेने त्वरित कारवाईला सुरुवातही केली. ज्या दुकानात संदीप माळवी यांना मारहाण करण्यात आली त्या एकविरा पोळीभाजी केंद्रासह आजूबाजूच्या ७ दुकानांना पालिकेने सील ठोकले असून त्यांच्या शेड पाडण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस आणि पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुकानावर कारवाई झाल्यानंतर पालिका आयुक्त जयस्वाल हे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले. फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर आयुक्तांनी रेल्वेस्थानक परिसरातील उड्डाणपुलाची पाहणी केली. त्याचदरम्यान, त्यांनी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचे समजते.
ठाण्यातील नौपाडा परिसरातील गावदेवी येथे अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. बुधवारी उपायुक्त माळवी आणि त्यांचे पथक गोखले रोड भागात गावदेवी परिसरात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी फेरीवाल्याशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर फेरीवाल्याने माळवी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. इतर फेरीवाल्यांनीही माळवी यांच्यावर हल्ला केला. अतिक्रमणविरोधी पथकातील चार पोलीस कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार घडला. पण त्यांनाही फेरीवाल्यांना रोखणे शक्य झाले नाही. या हल्ल्यात माळवी जखमी झाले आहेत. माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिकेत यासंबंधी बैठक झाली. मुजोर फेरीवाल्यांना लगाम घालण्यासाठी कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना हद्दपार करण्यात पालिका यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.