वसई-विरारमध्ये फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचे तीनतेरा
सुनियोजित विकासाचे दावे करून वसई-विरारमधील नागरिकांना भुलवणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे मुजोर झालेले पालिका प्रशासन यांच्या आशीर्वादाने वसई-विरारमध्ये फेरीवाल्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. फेरीवाल्यांकडून होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. मात्र वसई-विरार महापालिकेने हे धोरण कागदावरच ठेवले असल्याने शहरातील पदपथ, चौक, स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापून टाकला आहे. अगदी पालिकेच्या मुख्यालयाचा परिसरही यातून सुटलेला नाही.
वसई-विरार शहरांमध्ये फेरीवाला धोरण नसल्याचा गैरफायदा घेत ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी बाजार सुरू केला आहे. त्यासाठी रस्ते, पदपथ, चौक, स्थानक परिसरात सर्रास अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. शिवाय पादचाऱ्यांनाही ये-जा करणे दुरापास्त बनत चालले आहे. वसई, नालासोपारा आणि विरार या मुख्य शहरांतीेल रेल्वे स्थानकातून उतरल्या उतरल्या फेरीवाल्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या गाडय़ा आणि स्टॉल अनधिकृतपणे उभ्या असल्याने वाहतुकीला मोठा खोळंबा होतो. शहरात किती फेरीवाले आहेत, याची जुजबी आकडेवारीही पालिकेकडे नाही. दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने वसई-विरार महापालिकेला राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर पालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही केलेली नाही.

दोन महिन्यांत धोरण राबविणार -उपायुक्त
पालिकेकडे फेरीवाल्यांची आकडेवारी नसल्याची कबुली उपायुक्त अजिज शेख यांनी दिली आहे. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी एका कंपनीला कंत्राट दिल्याचे त्यांनी दिली. या सर्वेक्षणात शहरात किती फेरीवाले आहेत, उपलब्ध जागा, फेरीवाला झोन तयार केले जातील असे ते म्हणाले. दोन महिन्यांत हे सर्वेक्षण पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
कुणालाच स्वारस्य नाही
फेरीवाल्यांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक अनधिकृत बांधकामांच्या विषयात लक्ष घालतात. पण फेरीवाल्यांच्या प्रश्नावर कुठलाच राजकीय पक्ष आवाज उठवत नाही अशी खंत वसईच्या शैलेंद्र घोलप यांनी व्यक्त केलीे. रेल्वे स्थानकात उतरून घरी माणिकपूरला जायला वाहतूक कोंडी होते ते फेरीवाल्यांमुळे असे माणिकपूरचे रहिवासी जयेश जाधव यांनी सांगितले. फेरीवाले गरज असले तरी त्यांचे सुनियोजित व्यवस्थापन व्हायला हवे असेही त्यांनी सांगितले.

येथे फेरीवाल्यांचा उपद्रव

विरारमध्ये पूर्वेला सबवे, रेल्वे पादचारी पूल, पंढरीनाथ चौधरी मार्ग, मिर्झा नगर रोड, साने गुरुजी बालोद्यान, मकवाना कॉम्प्लेक्स, नारिंगी बायपास रोड, नालासोपारा पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक लगतचा परिसर, सोपारा रोड, तुळिंज आचोळे रोड, निळेमोरे रिक्षा स्टँड, महामार्ग रस्ता या ठिकाणीे तर वसईत अंबाडी मुख्य रस्ता, आनंद नगर, माणिकपूर नाका, पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर.