डोंंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात बेसुमार बेकायदा इमारतींची कामे सुरू आहेत. पालिकेचे आरक्षित भूखंड, मोकळ्या जागा हडप करून या बेकायदा इमारती भूमाफियांकडून उभारल्या जात आहेत. कोपरमधील सखाराम नगर गृहसंकुलाच्या बाजुला उद्यानाच्या आरक्षणावर भूमाफियांनी एक सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे.

या इमारतीला तात्काळ रंगरंगोटी करून या इमारतीवरून कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाकडून कारवाई होऊ नये अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. पालिकेच्या नगररचना विभागातील एका कर्मचाऱ्याला हाताशी धरून या जागेच्या आरक्षित भौगोलिक क्षेत्रात बदल करून या बेकायदा इमारतीची उभारणी केली असल्याची माहिती या भागातील स्थानिकांनी दिली आहे.

सखारामनगर गृहसंकुल भागातील पालिकेचे आरक्षित भूखंड हडप करून भूमाफियांनी बेकायदा इमले उभे केले आहेत. यापूर्वी या भागातील काही बेकायदा इमारतींवर कारवाई झाल्या आहेत. डोंबिवलीत सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणाऱ्या, महारेरा गुन्हे प्रकरणात आरोपी असलेल्या एका भूमाफियाचा या बेकायदा इमारत प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचे या भागातील तक्रारदारांनी सांंगितले. या इमारतीची तक्रार करणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील माध्यम क्षेत्रातील आणि एका लोकप्रतिनिधीला या बेकायदा माफियांनी दोन सदनिका निशुल्क दिल्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या बेकायदा इमारतीची पालिकेत नावनिशी तक्रार केली तर कोपर भागात फिरणे मुश्किल होईल या भीतीने या बेकायदा इमारती विषयी उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही.

हेही वाचा >>> Thane 12th Result : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.०८ टक्के- यंदाही मुलींची बाजी, विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

पालिकेतील नगररचना विभागातील एका वाद्ग्रस्त कर्मचाऱ्याने ही बेकायदा इमारत उभारणीसाठी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या बेकायदा इमारतीमुळे परिसरातील सोसायट्यांमधील रहिवासी त्रस्त आहेत. याबेकायदा इमारती विषयी कोपर भागातील काही स्थानिकांनी पालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. परिसरातील रहिवाशांच्या पाणी पुरवठा या बेकायदा इमारतीमधील रहिवाशांकडून वापरला जाणार असल्याने या भागातील लोकांंना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले असल्याने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी कोपर मधील या बेकायदा इमारतीसह कोपरमधील ९० फुटी रस्त्यावरील शिवसेना शाखेजवळील बेकायदा इमारत, जुनी डोंबिवलीतील प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या फशी हाईट्ससह दोन इमारती, ठाकुरवाडीतील शिव लिला, राहुलनगरमधील सुदामा हाईट्स, रमाकांत आर्केड, कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्यांचा खुराडा, कंभारखाणपाडा भागातील नव्याने उभ्या राहत असलेल्या बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे. नगररचना विभागातील अधिकाऱ्याने कोपर भागात सखारामनगर भागात एकही नवीन इमारतीला अलीकडे बांधकाम परवानगी दिलेली नाही, असे सांगितले.