ठाणे – उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यात यंदा ९२. ०८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल हा कमी लागला असला तरी, यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात ९४.०७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, यंदा विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजेच ९७.०५ टक्के निकाल लागला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत कोपर येथे नैसर्गिक तलाव रस्त्यासाठी बुजविण्याच्या हालचाली, पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२३ -२४ चा इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा ठाणे जिल्हाचा निकाल ९२.०८ टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून बारावीच्या परिक्षेला एकूण ९७ हजार ६६२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ८९ हजार ९३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या ८९ हजार ९३५ विद्यार्थ्यांमध्ये ४५ हजार ६५५ मुले आणि ४४ हजार २८० मुलींचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ग्रामीण भागातील मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला असून याठिकाणी ९८.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. मुरबाड तालुक्यातील १ हजार ९६५ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. यापैकी १ हजार ९२६ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ९३९ मुलांचा तर, ९८७ मुलींचा समावेश आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात ठेकेदाराची मुजोरी, मतदान यंत्र ठेवलेल्या परिसरात आदेशानंतरही खोदकाम करून विद्युत वाहिनी तोडली

विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल यंदा जिल्ह्यात विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजेच ९७.०५ टक्के निकाल लागला आहे. या शाखेतून ३९ हजार ३१ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ८८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ९१.३४ टक्के लागला असून या शाखेतून ४५ हजार ११९ विद्यार्थ्यांपैकी ४१ हजार २१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, कला शाखेचा निकाल ७९.३९ टक्के लागला आहे. या शाखेतून १२ हजार ६६३ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १० हजार ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ९३.६६ टक्के लागला आहे. या अभ्यासक्रमाची परिक्षा ५६८ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ५३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यासह, तंत्रज्ञान विज्ञान शाखेचा अभ्यासक्रमाचा निकाल ८९.६७ टक्के लागला असून या अभ्यासक्रमाच्या परिक्षेला २८१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.