पाहणी दौऱ्यातील प्रकार; फेरीवाल्यांकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई झाली की नाही, हे पाहण्यासाठी रविवारी सायंकाळी या भागात पाहणी दौरा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांना फेरीवाल्यांनीच घेराव घातल्याची घटना घडली. उर्सेकरवाडीत अचानक हा प्रकार घडला. सुमारे दोनशे फेरीवाले अंगावर चालून आल्याने हळबे काही काळ गोंधळून गेले होते. यावेळी फेरीवाल्यांनी हळबे यांना उद्देशून ‘तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करीत आहात,’ असे सांगत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
हा प्रकार पाहून काही वेळ महापालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाची तारांबळ उडाली. हळबे यांनी तत्काळ रामनगर पोलिसांना संपर्क केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांच्या समक्ष फेरीवाले हळबे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. ‘कल्याणमधील फेरीवाले हटविले जात आहेत. मग डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाले पथकाकडून का हटविले जात नाहीत, हे पाहण्यासाठी आपण दररोज बाजारात फेरी मारतो. रविवारी संध्याकाळी रेल्वे स्थानक भागातून फेरी मारीत असताना अचानक पुरुष, महिला फेरीवाले अंगावर चालून आले. अर्वाच्य भाषेत त्या शिवीगाळ करीत होत्या. आपण त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला पण कोणीही काही ऐकले नाही,’ असे हळबे यांनी सांगितले.
डोंबिवलीत फेरीवाल्यांनी केलेल्या मुजोरीची माहिती नगरसेवक हळबे यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना सोमवारी सकाळी दिली. आयुक्त रवींद्रन यांनी येत्या दोन दिवसात डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाले कायमस्वरूपी हटविले जातील. या भागात नवीन फेरीवाला हटाव पथक नेमण्यात येणार आहे, असे आश्वासन हळबे यांना दिले.
दरम्यान, येत्या दोन दिवसात महापालिकेकडून डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाले हटविण्यात आले नाहीत तर या फेरीवाल्यांविरोधात मनसे स्टाइलने कारवाई केली जाईल, असा इशारा हळबे यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंदार हळबे यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांच्या तक्रारी
दरम्यान, नगरसेवक हळबे हे अतिशय वाईट पद्धतीने कर्मचाऱ्यांशी वागत आहेत. फेरीवाल्यांना हटवूनही ते काही वेळा अर्वाच्य भाषेत बोलतात. जे फेरीवाले रस्ते, पदपथ अडवून बसत आहेत. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जात आहे. तरीही नगरसेवक हळबे कारवाईसाठी आग्रही राहत आहेत, अशा तक्रारी काही पालिका कर्मचाऱ्यांनी केल्या. नगरसेवकाने फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा पण विचार करावा. त्यासाठी त्यांना सामान्यांनी, आम्ही निवडून दिलेय का, असा प्रश्न काही फेरीवाल्यांनी केला. हळबे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. आपण कोणाला वाईट बोललो नाही. फेरीवाल्यांवर नियमित कारवाई व्हावी ही आपली अपेक्षा आहे. ती होत नसल्याने आपण कर्मचाऱ्यांना सतत सांगत होतो एवढेच, असे हळबे यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hawkers use foul language to mns councilor
First published on: 20-01-2016 at 00:03 IST