महावीर जैन रुग्णालय, प्रताप आशर कार्डिअ‍ॅक सेंटरचे उद्घाटन

ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी महापालिका आणि जितो ट्रस्टच्या माध्यमातून लुईसवाडी भागात श्री महावीर जैन रुग्णालय आणि प्रताप आशर कार्डिअ‍ॅक सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे नुकतेच लोकापर्ण करण्यात आले असून या रुग्णालयात ठाणेकरांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

जैन रुग्णालय आणि आशर काडिअ‍ॅक सेंटरचे लोकार्पण बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, जितो ट्रस्ट संचालित श्री. महावीर जैन रुग्णालयाचे विश्वस्त अजय आशर, ठाणे जितोचे अध्यक्ष महेंद्र जैन हे उपस्थित होते. १०८ खाटांच्या या रुग्णालयात कॅथलॅब, १६ खाटांचे डायलिसिस सेंटर, रेडिओलॉजी विभाग, अत्याधुनिक रोगनिदान केंद्र, बायपास आणि अन्य प्रगत शस्त्रक्रियांसाठी तीन शस्त्रक्रिया विभाग, नेत्रदोषांवरील शस्त्रक्रियांसाठी विशेष शस्त्रक्रिया विभाग, १६ खाटांचा अतिदक्षता विभाग, रुग्णांच्या नातलगांसाठी निवास आणि भोजन व्यवस्था अशा विविध सुविधांचा समावेश आहे. या ठिकाणी ठाणेकरांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.