शालेय विद्यार्थ्यांना अपघाताची भीती

कळवा येथील घोलाईनगर भागातून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गिकेखालील भुयारी मार्ग तुंबल्याने तसेच रस्ताही खचल्याने या भुयारातून ये-जा करणाऱ्यांना आता रेल्वे रूळ ओळांडून जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागत आहे. या ठिकाणी रूळ ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी रेल्वे मार्गाला वळण असल्याने लोकल अगदी जवळ येईपर्यंत दृष्टिपथात येत नाही.

घोलाईनगर परिसरात सुमारे २० हजार लोकवस्ती आहे. इथून काही अंतरावर मध्य रेल्वेचा धिमा मार्ग आहे. या मर्गिकेवरून सातत्याने उपनगरी गाडय़ांची ये-जा सुरू असते. रहिवाशांना रूळ ओलांडावा लागू नये म्हणून इथे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. मात्र, या भुयारी मार्गात सध्या गुडघाभर पाणी साठल्याने येथील रहिवाशांची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांना नाइलाजाने रूळ      ओलांडावा लागत आहे. सार्वजनिक सेवा-सुविधांचा अभाव असल्याने येथील रहिवाशांना शहरात येण्यासाठी भुयारी मार्ग ओलांडून पारसिक नगर गाठण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामुळे येथील हजारो नागरिक रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालून ये-जा करत असल्याचे दिसून येत आहे.

या संपूर्ण परिसरात शाळाही नाही. त्यामुळे येथील सुमारे ३०० ते ४०० लहान मुले शिकण्यासाठी पारसिक नगरची ही धोकादायक वाट धरतात. त्यामुळे दररोज सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास आणि दुपारी शाळा सुटण्याच्या म्हणजे १२ वाजेच्या सुमारास रेल्वे रूळ ओळांडणाऱ्यांची संख्या वाढलेली असते. गंभीर अपघात होऊ नये म्हणून पालक दररोज मुलांना शाळेत सोडण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी टीएमटीच्या बसेसही येत नसल्याने बसने प्रवास करणाऱ्या रहिवाशांनाही पारसिक नगरमध्ये येऊन बस पकडावी लागते.

या भुयारी मार्गात दर वर्षी पाणी भरते. त्यामुळे रहिवाशांना जाण्या-येण्याचा त्रास होतो. पाणी भरल्याने येथून ये-जा करणारे सुमारे ८० टक्के रहिवासी रेल्वे रूळ ओलांडतात. तसेच या भुयारी मार्गातून दुचाकीही जात असल्याने आतील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पारसिक नगर गाठण्यासाठी दुसरा मार्ग आहे. मात्र, तो मार्ग गाठण्यासाठी एक तास लागतो.

– पुष्पा परब, रहिवासी

या भीतिदायक प्रवासातून मुलांना सुखरूप घरी आणण्यासाठी दररोज पालकांना ने-आण करावी लागते. ही सर्व लहान मुले असल्याने अनेकदा अपघात होण्याची भीती वाटते.

– योगिता पवार, रहिवासी