पालघर, बोईसरमध्ये अपघातांना निमंत्रण ; पोलीस कारवाई करीत नसल्याने नागरिकांना त्रास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर तालुक्यात औद्योगिकीकरण झपाटय़ाने वाढत असून या उद्योगांमध्ये माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनं रस्त्याकडेला उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे अपघात वाढले असून ही समस्या गंभीर होत आहे. पालघरमध्ये ट्रक टर्मिनल नसल्याने तसेच बोईसरमध्ये टर्मिनलचा वापर केला जात नसल्याने ही ससम्या निर्माण होत आहे. या वाहनांविरोधात पोलीस कोणतीच ठोस उपाययोजना किंवा कारवाई करीत नसल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे.

पालघरमध्ये ट्रक टर्मिनलची व्यवस्थाच नाही

पालघर शहराच्या आजूबाजूला गेल्या १० वर्षांत लहान मोठय़ा खासगी औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या असून बोईसरप्रमाणेच पालघर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाऊ  लागले आहे. पालघर मध्ये काच्चामाल घेऊन येणाऱ्या किंवा परीचे भाडे मिळावे म्हणून काही दिवस वाट पाहणाऱ्या ट्रकना उभे राहण्यासाठी जागाच नसल्याने अशी वाहने रस्त्याकडेला उभी केली जातात. त्याच प्रमाणे ट्रान्सपोर्ट कंपन्यांची वाहने शहरात दाखल झाल्यानंतर त्या मधील वस्तू वितरित करण्यातही १० ते १२ तास थांबून राहत असल्याने अशा अवजड वाहनांची रस्त्याकडेला रंग लागते.

पालघर शहराला बायपास करणारा राज्यमार्गावर या अवजड वाहनाचे पार्किंग केले जात असून दुपदरी मार्गावर जाणारी वाहने अनेकदा रस्त्याकडेला थांबलेल्या वाहनाशी अपघातग्रस्त होताना दिसतात. पालघरमधील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी बोलाविलेल्या बैठकीत शहराच्या पूर्वेकडील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अवजड वाहने उभी करावीत असा निर्णय झाला. मात्र नगरपरिषदेने या बाबत योग्य प्रकारे पाठपुरावा न केल्याने हा विषय भिजत पडला आहे. पालघर शहरामध्ये अवजड वाहनांकरीत दिवसतील काही तासांची प्रवेश बंदी असून बाहेगावहून येणारऱ्या वाहनांना या बायपास मार्गावर आपली वाहने नाईलाजाने उभी करावी लागतात.

पालघर बायपास रस्त्यावर एक माध्यमिक शाळा असून या शाळेतील खासगी वाहने उभी असतात. या मार्गावर एक गॅरेज असून मोडकळीस आणि दुरुस्तीसाठी असलेली वाहने, तसेच जेसीबी, डंपर आदी वाहने या मार्गावर उभी ठेवल्याने अनेक लहान मोठे अपघात घडत असतात. हा राज्य मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखायटीमध्ये असून त्यांनी किंवा महसूल विभागाने या मार्गावरील अतिक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात आले नाही. ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी रस्त्यापर्यंतच्या जागेत कब्जा मिळविला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील ट्रक ट्रर्मिनल फक्त नकाशावर!

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १४०० कारखान्यांमध्ये दररोज हजारो मालवाहतूक करणारे ट्रक येत असून आठ तासांपेक्षा अधिक काळ थांबणारे वाहने वाहन तळावर ठेवण्याऐवजी ती रस्त्याकडेला उभी करण्यात येतात. बोईसरमधील तसेच तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सर्वच प्रमुख रस्त्यावर उभे असणाऱ्या माल वाहतूक वाहनांची डोकेदुखी वाढली आहे. अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उभारलेले वाहनतळाचा वापर होत नसल्याने तो  फक्त नकाशावरच राहिला आहे.

बोईसर- चिल्हार मुख्य रस्त्यावर खैरापाडा पुलापासून मुकत कंपनीपर्यंत मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे इतर वाहनांना व प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच टाकी नाका, कँम्लीन नाका, जिंदाल कंपनी परिसर, मुकत कंपनी ते बोईसर-ओत्सवाल रस्ता अशा रस्त्याच्याकडेला मालवाहतूक वाहनांची रांग लागलेली असते. काही वाहने तर दोन-चार दिवस कंपनीच्या गेट बाहेर असताना देखील अशा बेकायदेशीर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांवर कोणतेही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्लाँट नं. ओएस ३० या भूखंडावरील सुमारे ३.५ एकर जागा ट्रक ट्रर्मिनलसाठी राखीव ठेवली आहे. हा ट्रक टर्मिनल औधोगिक वासहीतच्या एका बाजूला आहे, त्या ठिकाणी पार्किंग करणारऱ्या वाहनचालकांची सोयीसुविधा नसल्याने या टर्मिनल वापर बहुतांश वाहनचालक करत नाहीत.

कसे असावे टर्मिनल

मालवाहतूक करणारी वाहणे उभी करण्यासाठी सुसज्ज असे वाहनस्थळ

शौचालय व स्नानगृहांची व्यवस्था

भोजन व्यवस्थेसाठी त्या ठिकाणी सुसज्ज उपाहारगृह

वाहनचालकांसाठी विश्रांतीगृह

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy vehicles parking on the streets
First published on: 15-09-2018 at 02:48 IST