कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत झालेल्या अक्षम्य चुका आणि प्रभाग आरक्षण रचनेत झालेला घोळ याविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. या घोळांमुळे कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यास नकार दिला आहे. दरम्यान, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी असूनही नगरपालिकेची निवडणूक घोषित केली याबद्दल राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने फटकारले.
प्रभाग क्र. २१ मध्ये आरक्षण सोडत प्रक्रियेत महिला आरक्षण पडल्याने याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत घेण्यात आली होती. याची दखल घेत प्रभाग क्र. २१ साठी फेरआरक्षण सोडत घेण्यात आली होती. परंतु, याबाबत समाधान न झाल्याने हरकतदार साकिब गोरे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण न्यायालयात असूनही निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याने न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठाने याबाबत आयोगाच्या या निर्णयावर ताशेरे ओढले. यामुळे आयोगाच्या वकिलांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली.