चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदू नववर्षांचा प्रथम दिन, तर ‘जमशेदी नवरोज’ हा पारशी नववर्षांचा प्रथम दिन. या दोन्ही धर्मियांच्या नववर्षांचा श्रीगणेशा शनिवारी एकाच दिवशी होणार असून ठाण्यात या दोन्ही उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. सांस्कृतिरित्या ढोलपथकांच्या, चित्ररथांच्या गजबजाटात साजरा केला जाणारा पाडवा, तर खाद्यपदार्थाची चंगळ असलेला जमशेदी नवरोज हा उत्सव ठाण्यात साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेसाठी एकीकडे ठाणेनगरीत चैतन्य संचारले असताना टेंभी नाका येथील ‘अग्यारी’त शनिवारी ठाणे शहरातील शेकडो पारशी बांधव जमणार आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस इराणमध्ये बर्फ वितळण्यास सुरूवात होते. त्यामुळेच पारशी बांधवांचे नववर्ष ‘फेस्टिवल ऑफ स्प्रिंग’ या नावानेही ओळखले जाते.
जमशेदी नवरोज हा उत्सव मुख्यत: इराण, इराक व इराणलगतच्या अफगाणिस्तानच्या वेशीवर साजरा केला जातो. त्यामुळे याला ‘खुर्दिश नववर्ष’ असेही म्हटले जाते. नववर्ष तयारीसाठी पारशी बांधव विविध वस्तूंनी घरातील टेबल सजवतात. यामध्ये दूध, वाईन, साखर, मेणबत्ती, सफरचंद, हिरव्या भाज्या, काच, चांदीची नाणी, विनेगर अशा विविध गोष्टींचा समावेश असतो, तसेच या टेबलवर इराण येथील सर्वात उंच शिखर असलेल्या डेमावंद डोंगराचे छायाचित्र आणि काचेच्या वाडग्यात सोनेरी मासा ठेवण्याची पद्धत आहे. वेगवेगळ्या खाद्यपदार्थानी नटविण्यात आलेले हे टेबल जमशेदी नवरोज नववर्ष दिवसानंतर पुढील तेरा दिवसांसाठी ठेवण्याची परंपरा आहे.  
नववर्षांच्या दिवशी सकाळी पारशी बांधव स्वच्छ अशा पांढऱ्या पोशाखात आपल्या कुटुंबासह धर्मस्थळी म्हणजे अग्यारीत जातात. ठाणे जिल्ह्यातील आसपासच्या परिसरात अग्यारी नसल्यामुळे ठाणे शहरातील टेंभी नाका येथील अग्यारीत अन्य शहरातून पारशी बांधव या दिवशी जमतात. अग्यारीत पारशी बांधव अग्नीला स्मरून प्रार्थना करतात. हा उत्सव फालूदा, कलिंगड ज्यूस पिऊन  साजरा करतात.