मराठी ग्रंथ संग्रहालयाचा अभिनव उपक्रम

ठाणे : गेल्या १२८ वर्षांपासून ठाणेकरांच्या वाचनाची भूक भागवणारे मराठी ग्रंथ संग्रहालय टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दोन महिन्यांनी पुन्हा सुरू झाले आहे. करोनाच्या सर्व नियमांचे पालन करून बुधवार, ९ जूनपासून ग्रंथालयातील अभ्यासिका पन्नास टक्के क्षमतेने तर पुस्तकांची देवाणघेवाण पूर्ववत होत आहे. तसेच ग्रंथ संग्रहालयातर्फे ‘फोन अ बुक’ ही सेवा सुरू करण्यात आली असून यामुळे वाचकांना घरपोच पुस्तक मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केल्याने एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ग्रंथ संग्रहालय वाचकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर आता ग्रंथ संग्रहालय सुरू होणार असून ते सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू असणार आहे. ग्रंथालयातील अभ्यासिका पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहे तर संस्थेचे सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पन्नास टक्के क्षमतेने वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरातच पुस्तक उपलब्ध  व्हावीत, यासाठी ग्रंथ संग्रहालयालतर्फे शहरात ‘ग्रंथयान’ चालविले जाते. हे ग्रंथयानही येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.

मराठी ग्रंथ संग्रहालयालाच्या ठाणे संस्थेला नुकतीच १२८ वष्रे पूर्ण झाली असून सभासदांमार्फत वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मराठीसह विविध भाषांमधील सुमारे दोन लाख पुस्तके ग्रंथ संग्रहालयात आहेत. त्याचा ठाण्यातील मोठा वाचकवर्ग लाभ घेत असतो. परंतु मागील वर्षभरापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथ संग्रहालय अनेक महिने बंद असल्याने त्याचा परिणाम सदस्यसंख्येवर झाला आहे. टाळेबंदीपूर्वी ग्रंथ संग्रहालयाची सदस्यसंख्या पाच हजारांच्या घरात होती. ती आता केवळ दीड ते दोन हजारांवर येऊन ठेपली आहे.

सदस्यसंख्या वाढविण्यासाठी संस्थेमार्फत ग्रंथयानसारखे विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी दिली.

वाचकांसाठी ‘फोन अ बुक’ सेवा

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सदस्यसंख्येमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एक मोठा वर्ग आहे. करोना काळात नागरिकांचा पुस्तकांची देवाणघेवाण करण्याचा त्रास वाचावा म्हणून ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने फोन अ बुक ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यात नागरिक हवे ते पुस्तक फोन करून आपल्या घरी मागवू शकतात आणि वाचलेले पुस्तक परत करू शकतात. नागरिकांना ग्रंथ संग्रहालयातील पुस्तक एका क्लिकवर उपलब्ध व्हावीत म्हणून मराठी ग्रंथ संग्रहालयाचे एक विशिष्ट मोबाइल अ‍ॅप्लिकेशन लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथ संग्रहालयामार्फत देण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home delivery service of books for readers ssh
First published on: 10-06-2021 at 01:08 IST