सुधा सोमणी,मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या रोजच्या जगण्यात विज्ञानाशी अगदी जवळून संबंध येत असतो. पण या क्रिया-प्रक्रियांना आपली नजर इतकी सरावलेली असते की, त्यामागचं वैज्ञानिक शास्त्र आपल्या नजरेतच येत नाही. या विज्ञानावरील पडदा दूर करतानाच त्याबद्दलच्या युक्त्या सांगणारे हे सदर.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञान एखाद्या सावलीसारखे आपल्याला सोबत करीत असते. सकाळी उठल्यावर दात घासण्यासाठी आपण ब्रश वापरतो. वर्तमानपत्र वाचण्यासाठी ठरावीक वयानंतर आपण चष्मा वापरतो. सकाळी धावपळीच्या वेळी मायक्रोवेव्हमध्ये कॉफी करून घेतो. थंडीच्या दिवसात एकाला एक जोडून अंथरूण घालतो, अशा अनेक क्रियांमागे विज्ञान आहे. आजच्या लेखात आपण प्रेशर कुकरमागचे विज्ञान समजून घेणार आहोत. १६७९ मध्ये डेनिस पापेन या फ्रेंच शास्त्रज्ञाने प्रेशर कुकर (त्या काळातील स्टीम डायजेस्टर) या संकल्पनेचा शोध लावला. २० व्या शतकाच्या सुरुवातीला त्याची विविध रूपे बाजारात दिसू लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा खूप लोकप्रिय झाला. कुकरमध्ये वरणभात, छोले ते अगदी मटणसुद्धा कमी वेळेत शिजते. कमी वेळेत अन्न शिजविण्याची ही किमया वाफेची बरं का!

रबर रिंगच्या (गॅस्केट) मदतीने आपण त्यात वाफ कोंडून ठेवतो. त्यामुळे कुकरमध्ये उच्चदाब तयार होतो. या उच्चदाबाला पाण्याचा उत्कलनांक १०० अंश सेल्सिअस न राहता साधारण १२० अंश सेल्सिअसपर्यंत वाढतो. कुकरच्या आत १२० सेल्सिअस तापमानाची असलेली ही वाफ अन्न लवकर शिजविते. कुकरमध्ये पुरेशी वाफ आणि दाब तयार झाल्याची वर्दी आपल्याला पहिल्या शिट्टीमुळे मिळते. त्यानंतर गॅसची ज्योत बारीक करावी. त्यामुळे वाफेबरोबर उष्मा बाहेर जात नाही. गरजेपेक्षा अधिक वाफेचा दाब तयार झाल्यास अपघात टाळण्यासाठी सेफ्टी व्हॉल्व्ह दिलेला असतो. तो अशा परिस्थितीत अतिरिक्त वाफेला बाहेरची वाट करून देतो. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून अन्नाच्या प्रमाणातच पाणी वापरावे.  वरणभातासाठी मंद आचेचा गॅस दहा मिनिटे आणि मटण शिजण्यासाठी २० मिनिटे पुरेशी आहेत. वारंवार शिट्टी देऊन आपण गॅसची ऊर्जा वाया घालवितो. मंद आचेवरही हे काम होते. त्यामुळे आपल्या इंधन वायूची बचत होते. एक काळजी फक्त घ्यावी, गॅस बंद केल्यानंतर किमान दहा मिनिटे तरी कोंडलेल्या वाफेला अन्न शिजविण्यासाठी द्यावेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home science how to smoke in a pressure cooker
First published on: 12-01-2019 at 01:48 IST