सर्वसाधारणपणे फास्टफूडच्या पंक्तीतली पावभाजी लहानथोर सर्वामध्ये लोकप्रिय आहे. खरेतर ते मुंबईतील चाकरमान्यांचे खाद्य आहे. पावभाजी ही संकल्पना मुळातच मुंबई येथील गिरणी कामगार यांनी आणली. कारण हा पदार्थ करायला फार वेळ लागत नाही. पुन्हा तो अतिशय चविष्ट आहे. साहजिकच पावभाजी हे मुंबईकरांच्या सर्वाधिक पसंतीचे खाद्य बनले. निरनिराळी हॉटेल्स ते हातगाडय़ांपर्यंत सर्वत्र पावभाजी सर्रासपणे मिळू लागली. पावभाजीची रेसिपी सर्वसाधारणपणे सारखीच असली तरी काहींनी वैशिष्टय़पूर्ण चव जपत आपला वेगळेपणा कायम ठेवला आहे. ठाण्यातील श्री पावभाजी सेंटर त्यापैकी एक. पावभाजीपासून तवा पुलावपर्यंत विविध प्रकारच्या डिशसाठी हे सेंटर लोकप्रिय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी ठाण्यातील पावभाजीप्रेमींना पावभाजी खाण्यासाठी परळ, लालबाग, माहीम अशा ठिकाणी जावे लागायचे. कारण चार दशकांपूर्वी ठाण्यात पावभाजीच्या फारशा गाडय़ा नव्हत्या. त्यामुळे श्रीचंद गुप्ता यांनी ३८ वर्षांपूर्वी ठाण्यात पावभाजीची गाडी सुरू केली. त्या घरगुती चवीची परंपरा आता त्यांचा मुलगा गोविंद गुप्ता पुढे सांभाळत आहे. श्री पावभाजीमध्ये आपल्याला रेग्युलर बटर पावभाजी, तवा पुलाव, खडा पावभाजी, मसाला पाव, आलू चाट, जैन पावभाजी, हाफ जैन पावभाजी, कांदा फ्राय पावभाजी, जिरा राइस असे पावभाजीचे १० पदार्थ चाखायला मिळतात. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बटाटा, फ्लॉवर, वाटाणा या भाज्यांपासून रेग्युलर बटर पावभाजी बनवली जाते. प्रथमत: तव्यामध्ये तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यंत परतला जातो. त्यानंतर त्यात जिरे, आले, लसूण पेस्ट टाकून सगळं मिश्रण भाजून घेतलं जातं. या मिश्रणात सर्व भाज्या टाकून त्या व्यवस्थित एकत्रित केल्या जातात. त्यानंतर त्यात गरम मसाला, मीठ, घरी बनविलेला श्री पावभाजी मसाला आणि थोडं पाणी टाकून चांगला सुगंध येईपर्यंत ते मिश्रण ढवळले जाते. भाजी तयार झाल्यावर त्यात बटर टाकून ही पावभाजी खाण्यासाठी मस्त सजावट करून खवय्यांना दिली जाते. खडा पावभाजी म्हणजे सगळ्या भाज्या उभ्या कापून तयार केलेली पावभाजी. या पावभाजीमध्ये गरम तेलात कांदा लाल होईपर्यंत एकत्रित करून त्यात आलं, लसूणची पेस्ट टाकून, मिश्रण एकसंध करून भाजून घेतलं जातं. त्यानंतर त्यात उभ्या कापलेल्या भाज्या टाकून त्या भाज्यांचा रस मिश्रणात एकजीव होईपर्यंत शिजवल्या जातात. अशाप्रकारे खडा पावभाजी तयार केली जाते. बटर आणि खडा पावभाजीबरोबरच येथे कांदा, आलं, लसूण न आवडणाऱ्यांना जैन व हाफ जैन पावभाजीचीही चव चाखायला मिळते. टोमॅटो, सिमला मिरची, मटार, कोबी किंवा कच्च्या केळीपासून जैन पावभाजी बनवली जाते. प्रथमत: तव्यावर तेल गरम करून त्यात जिरे, टोमॅटो, सिमला मिरची टाकून त्याचे मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर त्यामध्ये कोबी किंवा कच्चे केळे, श्री पावभाजी मसाला, गरम मसाला आणि मीठ टाकून मिश्रणाला एकजीव करून जैन पावभाजी तयार केली जाते. पावभाजीमध्ये कोबी किंवा केळे न आवडणाऱ्यांसाठी जैन पावभाजीच्या पद्धतीप्रमाणेच बनवलेल्या हाफ जैन पावभाजीची चवही येथे चाखता येते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homemade pav bhaji center at thane
First published on: 11-06-2016 at 01:49 IST