कल्याण – जमीन विषयाशी संबंधित शेकडो प्रकरणे महसूल सप्ताह निमित्त आयोजित फेरफार अदालतमध्ये कल्याणमध्ये मार्गी लावण्यात आली. जिल्हा अधीक्षक, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक कल्याण भूमि अभिलेख यांनी या फेरफार अदालतचे आयोजन केले होते. नागरिकांचे जमीन विषयक अनेक प्रश्न या अदालतच्या माध्यामातून मार्गी लावण्यात आले, अशी माहिती कल्याणचे भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक नितीन साळुंखे यांनी दिली.भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या फेरफार अदालतचे कल्याण विभागाचे उप अधीक्षक भूमी अभिलेख नितीन साळुंखे यांनी आयोजन केले होते.
कल्याण परिसरातील नगर भूमापन विभागातील मौजे कल्याण, गांधारे, वाडेघर, बारावे परिसरातील गावांमधील रहिवाशांनी या अदालतमध्ये प्रकरणे दाखल केली होती. नागरिकांचे जमीन विषयक अनेक विषय प्रलंबित असतात. हे विषय अनेक वेळा मार्गी लागण्यात काही अडचणी असतात. हे विषय घेऊन येणारे नागरिक बहुधा ज्येष्ठ नागरिक, वृध्द असतात. वंशोपरंपरागत जमिनीच्या प्रकरणांचा यामध्ये समावेश असतो. अनेक वेळा जमीन मालक मृत्यू होऊन अनेक वर्ष झालेली असतात पण त्यांच्या वारसांची नोंद झालेली जमीन कागदपत्री झालेली नसते. काही वेळा जमीन खरेदी व्यवहार झालेला असतो, पण त्याची कागदोपत्री नोंद केलेली नसते. अशा त्रृटींमुळे अनेक जमीन मालकांचे व्यवहार आणि इतर विषय मार्गी लागत नव्हते.
हे सर्व विषय एका व्यासपीठावर मार्गी लागावेत म्हणून जिल्हा अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक नितीन साळुंखे यांनी फेरफार अदालतचे गुरुवारी आयोजन केले होते. यापूर्वीही अशाच प्रकारचा उपक्रम डोंबिवलीतील नागरिकांसाठी भूमी अभिलेख विभागाने आयोजित केला होता. त्या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.या फेरफार अदालतमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक यांनी तक्रारदार नागरिकांच्या अडचणी, कागदपत्रातील त्रृटी समजून घेतल्या आणि त्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. यावेळी शेकडो प्रकरणे मार्गी लावण्यात आली.