कल्याण- कल्याण जवळील शहाड येथे सोमवारी रात्री पतीने आपल्या पतीवर धारदार पातेने वार करुन तिला गंभीर जखमी केले. ती बेशुध्द होऊन जमिनीवर पडल्यावर तिच्या डोळ्यात, अंगावर मिरची पूड टाकून पती पळून गेला. खडकापाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान सिताराम पाटील (३५, चालक, रा. शहाड, पारस ढाब्याजवळ, कल्याण) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा धुळे जिल्ह्यातील बोधगावचा रहिवासी आहे. दक्षता समाधान पाटील असे त्याच्या जखमी पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी दक्षताची बहिण आरती भोईर (रा. गुरुनाथ कशेळकर चाळ, मोहणे रस्ता, शहाड, कल्याण) हिच्या तक्रारी वरुन पोलिसांनी आरोपी समाधान विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली जवळील वडवली गावात १५ लाखाचा गुटखा जप्त
पोलिसांनी सांगितले, समाधानची पत्नी दक्षता ही तिच्या माहेरी शहाड येथे आली आहे. सोमवारी रात्री आठ वाजता पती समाधान दक्षता हिला घरी नेण्यासाठी आला. त्यावेळी दक्षताने आपण येणार नाही असे स्पष्ट सांगितले. त्याचा राग पती समाधानला आला. त्याने पत्नी दक्षताला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी दक्षताने बहिण आरतीला घडला प्रकार सांगत असतानाच ‘तु माझ्या सोबत आली नाहीस तर, मी तुला जिवंत सोडणार नाही’. असे बोलुन खिशातून धारदार पात काढून पत्नीच्या गळ्यावर, हातावर वार करण्यास सुरुवात केली. पत्नीने पतीला प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्याने रागाच्या भरात पत्नीच्या सर्वांगावर धारदार पातेने वार केले. ती बेशुध्द होऊन खाली पडली. त्यावेळी आरोपी पती समाधान याने पत्नीच्या अंगावर व डोळ्यात मिरची पूड टाकून पळून गेला. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. गवळी या प्रकरणाचा तपास करत आहेत.