भरधाव दुचाकीस्वारांच्या जीवघेण्या कसरतींमुळे स्थानिकांना त्रास

उपवन परिसरातील मोकळ्या रस्त्यावर दुचाकीस्वारांकडून होणाऱ्या जीवघेण्या कसरतींना पुन्हा एकदा ऊत आला असून सकाळ-सायंकाळच्या वेळेत या ठिकाणी पाय मोकळे करण्यासाठी येणारे ठाणेकर यामुळे अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. उपवन येथील तलावाजवळ विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये या वेगवेडय़ांमुळे कायम भीतीचे वातावरण असते. तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण आणि ठाणे वाहतूक शाखेच्या तत्कालीन उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी या दुचाकीस्वारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून उपवनच्या रस्त्यावर पुन्हा हा धुमाकूळ सुरू झाला आहे.

ठाण्यात मोकळ्या जागांची वानवा असल्याने तलावांलगत फेरफटका मारवयास येणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच मोठी आहे. येऊरचा डोंगर आणि त्यालगत असलेला उपवनचा तलाव हे ठाणेकरांसाठी प्राणवायूचे अखंड स्रोत मानले जातात. शहराच्या एका कोपऱ्यात शांत परिसर अशी ओळख असलेल्या उपवनला अनेक नागरिक सकाळ, सायंकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या ठिकाणी व्यायाम, जॉगिंग  करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उपवन परिसराकडे असलेला नागरिकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनेही या तलावक्षेत्राचे रूपडे पालटण्यासाठी विविध प्रकारचे सुशोभीकरण प्रकल्प या ठिकाणी राबविण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी वेगवेडय़ा बाइकस्वारांमुळे येथील शांततेचा भंग होऊ लागला असून रस्त्याच्या कडेने चालत उपवन गाठू पाहणाऱ्या नागरिकांच्या मनात धडकी भरू लागली आहे.

उपवन परिसरातील महापौर बंगल्याजवळ हे बाइकस्वार कसरती करताना दिसतात. कसरती करताना मोठय़ा आवाजात सायलेन्सर तसेच हॉर्नचा आवाज करत तरुण शक्तिप्रदर्शन करताना दिसतात. शनिवार आणि रविवारी तरुणांचे जथे स्पोर्ट्स बाइक घेऊन उपवन येथे दाखल होतात. मोकळ्या रस्त्यावर अपघात होऊ नये यासाठी गतिरोधक असले तरी तरुण या गतिरोधकांवर देखील कसरती करत असतात. व्हिली, स्टॉपी, झिकझ्ॉक अशा दुचाकी कसरती करत तरुण या परिसरात मोकाट फिरताना दिसतात. कसरती करताना वेगाने दुचाकी चालवणाऱ्या तरुणांना रस्त्यावर चालणाऱ्या इतर नागरिकांचे भान नसते. दुचाकीस्वारांच्या बेताल वागण्यामुळे या परिसरात पूर्वी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वेगाने दुचाकी चालवत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांची माहिती देण्यासाठी तत्कालीन वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला होता. या तरुणांवर आळा बसावा यासाठी साध्या पोशाखातील वाहतूक पोलिसांची नेमणूकदेखील करण्यात आली होती. मात्र अद्याप या तरुणांच्या वेगाने दुचाकी चालवण्याच्या कसरतीला आळा बसलेला नाही.

तरुण दुचाकीस्वारांवर आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ८२८६४००४०० किंवा ८२८६३००३०० हे हेल्पलाइन क्रमांक आजही सुरू आहेत. अनेकदा संबंधित माहिती मिळाल्यावर परिसरात कारवाईसाठी पोलीस जात असतात. कोणत्याही परिसरात नागरिकांना तरुण बाइक कसरती करताना आढळल्यास वाहतूक विभागाशी त्वरित संपर्क साधावा. – संदीप पालवे, वाहतूक पोलीस उपायुक्त, ठाणे