तीन महिन्यांत २० हजार बांधकामे तोडण्याचे कडोंमपा प्रशासनाचे लक्ष्य

कल्याण:  कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १० प्रभागांमधील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची जोरदार मोहीम पालिका, पोलीस पथकांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी  पालिकेने तयार केलेल्या कृती आराखडय़ाच्या नियोजनप्रमाणे येत्या तीन महिन्यांत टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, २७ गाव परिसरातील सुमारे २० हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. मागील पाच ते सहा वर्षांत सुमारे३४ हजार अनधिकृत बांधकामे शहरात उभी राहिली आहेत.

बेकायदा बांधकामांमुळे  पाणीपुरवठा, रस्ते, वीज, इतर नागरी सुविधांवर येणारा ताण विचारात घेऊन, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १० प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना आपल्या प्रभागातील बेकायदा इमारतींचा  सविस्तर कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक प्रभागात सुमारे ८० ते १०० हून अधिक अनधिकृत बांधकामांची माहिती जमा झाली. आयुक्त सूर्यवंशी यांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांना बेकायदा इमारती तोडण्यासाठी आवश्यक सहकार्य देण्याची मागणी केली. अशा इमारतींना वीज पुरवठा देऊ नये आणि इमारती तोडताना पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पोलीस, महावितरण अधिकाऱ्यांकडे केली. ती दोन्ही अधिकाऱ्यांनी तत्काळ मान्य केली. बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी आयुक्तांनी विशेष पथके तयार केली आहेत. जॉ क्रॅकर, जेसीबी, पोकलेन, हातोळे, गॅस कटर अशी सामग्री पथकाला उपलब्ध करुन दिली आहे. विभागीय उपायुक्त, साहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली १० प्रभाग हद्दीत सात ते आठ माळय़ांचे इमले, व्यापारी गाळे, चाळी भुईसपाट केल्या जात आहेत.

मागील सात दिवसांपासून १२ हून अधिक अनधिकृत इमारती पथकाने भुईसपाट केल्या. ह प्रभागात साहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी गरीबाचा पाडा भागात मांगल्य संकुलाजवळील कारवाई केली.  या ठिकाणचे ३६ नवीन गाळे, खोल्यांचा पोकलेनने चुराडा केला. डोंबिवली पूर्व भागात ग प्रभाग साहाय्यक आयुक्त रत्नप्रभा कांबळे, विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दत्तनगरमधील सरकारी जमिनीवरील पाच माळय़ाची बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्यात आली. ही इमारत तोडण्यासंदर्भात प्रशासनावर विविध माध्यमांतून दबाव आला होता. अ प्रभागात साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी मोहने, आंबिवली, टिटवाळा भागातील चाळी, इमले, फ प्रभागात साहाय्यक आयुक्त किशोर शेळके यांनी खंबाळपाडा भागातील बेकायदा इमारती, जोते जमीनदोस्त केले. ई प्रभागात भारत पवार यांनी २७ गाव भागातील बेकायदा इमले जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे जागरुक नागरिक  समाधान व्यक्त करत आहेत.