डोंबिवली – डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती कशा पाडायचा असा मोठा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत डोंबिवली पश्चिमेत बेसुमार बेकायदा बांधकामे भूमाफियांकडून सुरू करण्यात आली आहेत. डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथील काळुबाई मंदिराच्या पाठीमागील भागात दिल्ली ते उरण समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू मार्गाचे काम सुरू आहे. या रेल्वे मार्गासाठी सपाटीकरण करण्यात आलेल्या सीमा रेषेत भूमाफियांनी रात्रंदिवस काम करून एका बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे.

या बेकायदा इमारतीजवळ यापूर्वीच एक इमारत उभी आहे. बेकायदा इमारत उभारणीसाठी पुरेशी जागा नसताना उपलब्ध मोकळ्या जागेत हे बेकायदा बांधकाम केले जात आहे. या समर्पित जलदगती रेल्वे मार्गाजवळून सतत मालवाहू डब्यांमधून वेगवान पध्दतीने माल वाहतूक होणार आहे. यामुळे परिसरातील वस्ती, इमारतींना कर्णकर्कश कानठळ्या बसणाऱ्या आवाजाचे हादरे बसणार आहेत. हे माहिती असताना भूमाफियांनी या जलदगती रेल्वे मार्गात रेल्वे ठेकेदाराला न जुमानता, पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, ह प्रभागाचे अधिकारी यांना न घाबरता बेकायदा इमारतीचे काम सुरू केले आहे.

या बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले तर या इमारतीचे मलनिस्सारण आणि सांडपाणी थेट जलदगती रेल्वे मालवाहू मार्गात वाहून येणार आहे. या रेल्वे मार्गाच्या बाजुला उच्च दाब वीज वाहिकांची उभारणी होणार आहे. त्यांनाही या बेकायदा इमारतीचा अडथळा येणार आहे. भविष्यात जलदगती रेल्वे मालवाहू विस्तारीकरणाचे काम करताना या बेकायदा इमारतीचा अडथळा येणार आहे. हे माहिती असुनही रेल्वे मार्गालगतची जमीन हडप करून तेथे स्थानिक भूमाफियांनी गेल्या महिन्यापासून बेकायदा इमारतीचे काम सुरू केले आहे.

या बेकायदा इमारतीचे बांधकाम घाईने पूर्ण करून त्यामध्ये रहिवास निर्माण करायचा. या इमारतीमधील सदनिका कमी किमतीत विकून मोकळे व्हायचे असे नियोजन माफियांनी केले आहे. या बेकायदा इमारतीजवळ जाण्यासाठी चार फुटाचा एक बोळातील रस्ता आहे. त्यामुळे या बेकायदा इमारतीत भविष्यात आग लागली काही दुर्घटना घडली तर त्याठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, आपत्कालीन पथकाची वाहने कोठुन जाणार असे प्रश्न परिसरातील नागरिक करत आहेत. या बेकायदा इमारतीविषयी उघडपणे तक्रार केली तर भूमाफियांकडून त्रास होईल या भीतीने नागरिक मूग गिळून गप्प आहेत.

कोपर येथील बेकायदा इमारत प्रकरणी विनोद जोशी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. ह प्रभागात ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणात एकूण १८ इमारती आहेत. डोंबिवली पश्चिमेतील गुरचरण सरकारी जमिनींवरील १४ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यासाठी हरेश म्हात्रे यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. मयूर म्हात्रे यांनी पालिकेच्या राखीव भूखंडावरील आणि इतर बेकायदा इमारत प्रकरणी पालिकेत तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणी कारवाया प्रस्तावित असताना आता रेल्वे मार्गात भूमाफियाने बेकायदा इमारतीचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्याने या बांधकामाची पाहणी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.