कल्याण – टिटवाळा येथील इंदिरानगर भागात बेकायदा चाळी आणि जोत्यांची बांधकामे उभारून ही नवीन बांधकामे कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊ नयेत म्हणून भूमाफियांनी काळ्या प्लास्टिक कापडांनी झाकून ठेवली होती. पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या ही बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे नजरेस पडताच, त्यांनी शनिवारी सुट्टीचा दिवस असुनही मुसळधार पावसात तोडकाम पथकासह जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्ताची वाट न पाहता जमीनदोस्त केली.

टिटवाळा, मांडा परिसरात बेकायदा बांधकामे उभी केली की ती अ प्रभागाच्या तोडकाम पथकाकडून तात्काळ जमीनदोस्त केली जात आहेत. सर्वाधिक बेकायदा बांधकामे शुक्रवारी रात्री ते सोमवारी पहाटे या वेळेत बांधून पूर्ण केली जात आहेत. या कालावधीत पालिकेला सुट्टी असते. सुट्टीच्या कालावधीत अधिकारी कार्यालय, प्रभागात फिरत नाहीत. त्यामुळे टिटवाळा भागातील भूमाफियांनी नवीन शक्कल लढवली आहे. शुक्रवारी रात्री बेकायदा चाळ, जोत्यांच्या बांधकामांना सुरूवात करायची. ही बांधकामे सोमवारी सकाळपर्यंत बांधून पूर्ण करायची. त्यानंतर मंगळवारपासून ही बांधकामे ओली असुनही त्यामध्ये रहिवास आहे हे दाखविण्यासाठी बांधकामांच्या बाहेर दोऱ्या बांधून तेथे कपडे वाळत घालायचे. या बेकायदा बांधकामांमध्ये रहिवास आहे असे चित्र निर्माण करायचे. अशी क्लृप्ती आता भूमाफियांनी निवडली आहे, असे पाटील यांच्या निदर्शनास आले.

ही बेकायदा बांधकामे उभी राहिली की या बांधकामांवर काळी ताडपत्री टाकली जात होती. या काळ्या ताडपत्रीखाली वीटभट्टी आहे असे दाखविण्याचा प्रयत्न भूमाफिया करत आहेत. भूमाफियांच्या या सगळ्या हालचाली साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत.

आता भूमाफिया शुक्रवार ते सोमवार पहाटे या वेळेत मोकळ्या, अडगळीच्या, डोंगर कपारीतील जागांवर घाईने बेकायदा चाळी, जोते उभारणीची कामे करत आहेत, हे निदर्शनास आल्यापासून पाटील यांनी सुट्टी असूनही अ प्रभाग हद्दीत आपला दौरा आणि तोडकामाचे कार्यक्रम सुरू ठेवले आहेत.

अ प्रभाग अधिकाऱ्यांच्या या हालचालींमुळे मुसळधार पावसात बेकायदा चाळी उभारण्याचे भूमाफियांचे मनसुबे हाणून पडले आहेत. टिटवाळा इंदिरानगर भागात भूमाफियांनी रात्रीच्या वेळेत बेकायदा चाळी उभारल्या आहेत. डोंगर कपारीत चाळी उभारणीसाठी जोत्यांची बांधकाम केली आहेत. ही बांधकामे काळ्या प्लास्टिक ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आली आहेत अशी गुप्त माहिती साहाय्यक आयुक्त पाटील यांना शुक्रवारी रात्री समजली. त्यांनी शनिवारी सकाळीच जेसीबी, तोडकाम पथक घेऊन पोलीस पथकाची वाट न पाहता इंदिरानगरमध्ये धाव घेतली. तेथील चाळींची नवीन बांधकामे काळ्या प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली होती. बाजुला नवीन चाळी उभारणीसाठी जोत्यांची दहाहून अधिक जोत्यांची बांधकामे तयार करण्यात आली होती. पथकाने मुसळधार पावसात बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे भुईसपाट केली. कारवाई सुरू असताना एकही भूमफिया घटनास्थळी फिरकला नाही.