‘बेकायदा बांधकामांचे संरक्षण केले तर घरी जाण्याची तयारी ठेवा’ असा इशारा महापालिका आयुक्त मधुकर अर्दड यांनी देताच टिटवाळ्यातील अनधिकृत इमारतींविरोधातील काही दिवसांपासून सुरू असलेली जोरदार मोहीम तीव्र झाली आहे. आयुक्तांनी बेकायदा बांधकामांचे संरक्षण केल्याचा ठपका ठेवत रवींद्र गायकवाड या प्रभाग अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईचा धसका घेत आयुक्तांच्या आदेशावरून गेल्या आठवडय़ापासून टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे पाडण्याची धडक मोहीम प्रभाग अधिकाऱ्याकडून सुरूच आहे.
टिटवाळ्याकडून महापालिका अतिक्रमणविरोधी पथकाचा मोर्चा आता उंभार्णी, आंबिवली भागातील बेकायदा बांधकामांकडे वळला आहे. गेल्या दोन दिवसांत या भागातील ४० ते ५० बांधकामे पथकाने जमीनदोस्त केली. बल्याणी, मोहने परिसरातील बेकायदा बांधकामांवर वरवंटा फिरवण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. बल्याणी येथील शहर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे भूखंड हडप करून त्यावर भूमिपुत्रांनी चाळी, गाळे उभे केले आहेत. भूखंड मालक जागेवर जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले की त्यांना भूमिपुत्रांकडून ‘जागा आमची आहे’ असे दटावून पिटाळण्यात येत आहे.