कल्याण : गेल्या वर्षभराच्या कालावधीत एकही बेकायदा बांधकाम, व्यापारी गाळा अ प्रभाग हद्दीत उभा राहणार नाही. आणि चोरून लपून कोणी बांधला तर तो तात्काळ अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्याकडून तोडण्यात येत होता. शनिवार, रविवारी पालिका सुट्टीच्या दिवशी भूमाफिया बेकायदा बांधकामे करतात म्हणून या दोन्ही दिवशी अ प्रभागाचे बीट मुकादम, साहाय्यक आयुक्त टिटवाळ्यात बेकायदा बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी फिरत होते.

गेल्या महिन्यापासून अ प्रभागाचा साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार जयवंत चौधरी यांनी स्वीकारल्यापासून टिटवाळा, मांडा, बनेली, बल्याणी परिसरात रात्रंदिवस काम करून भूमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारण्याचा सपाटा लावला आहे.

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातून गेल्या वर्षभरात हटविण्यात आलेले फेरीवाले पुन्हा अ प्रभागातील अधिकारी बदलताच रेल्वे स्थानक भागात रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करण्यास सरसावले आहेत. अलीकडे भूमाफियांची अ प्रभागातील वर्दळ वाढली आहे. दीड वर्षापूर्वी अ प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याने तत्कालीन आयुक्तांनी रोकडे यांना निलंबित केले होते. त्यांच्या जागी प्रमोद पाटील यांची तात्काळ नियुक्ती केली होती.

पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून मागील वर्षभराच्या कालावधीत प्रभागात एकही नवीन चाळ, व्यापारी गाळा, इमारतीचे बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची विशेष काळजी घेतली होती. पावसाळ्यातही त्यांनीही तोडकाम मोहीम सुरू ठेवली होती. या सततच्या बेकायदा बांधकामे तोडण्याच्या मोहिमांमुळे भूमाफियांचे कंबरडे मोडले होते. अनेक भूमाफियांनी टिटवाळा, बनेली, बल्याणी परिसरातून आपले बस्तान हलवले होते. पण, अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची गेल्या महिन्यात अ प्रभागातून बदली होताच भूमाफियांनी पुन्हा अ प्रभागात बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, घराची उंची वाढविण्याची कामे जोमाने सुरू केली आहेत.

अ प्रभागाचे नव्याने पदभार स्वीकारलेले साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी प्रथमच साहाय्यक आयुक्त पद हाताळत आहेत. कामाचा उरक नसल्याने आणि गोंधळलेल्या प्रशासकीय परिस्थितीताचा गैरफायदा घेत भूमाफियांनी अ प्रभाग अधिकाऱ्यांना न जुमानता नव्याने बेकायदा बांधकामे सुरू केली आहेत. बल्याणी, बनेली भागात बेकायदा बांधकामांचा अधिक जोर आहे, अशा तक्रारी आहेत. यापूर्वी भुईसपाट केलेल्या बेकायदा चाळी पुन्हा उभारण्यास माफियांनी सुरूवात केली आहे. बनेली, बल्याणी टेकडी भागातील मोकळ्या जागा माफियांनी हडप करून तेथेही बांधकामे सुरू केले आहेत. रात्रंदिवस ही कामे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी माफियांच्या अ प्रभागात फेऱ्या वाढल्या आहेत.

अचानक अ प्रभागात एका वेळी बेसुमार बेकायदा चाळींची बांधकामे सुरू झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. आयुक्त अभिनव गोयल, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांनी टिटवाळा परिसरात अचानक फेरफटका मारून सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांची माहिती घ्यावी, अशी मागणी टिटवाळ्यातील जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रशासकीय कामे आणि निवडणूकविषयक कामे सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यावर या बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार आहे. – जयवंत चौधरी, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.