कल्याण – कल्याण ते माळशेज घाटमार्गे अहमदनगर या प्रस्तावित रेल्वे मार्गातील आंबिवली ते मुरबाड या २८ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण, मोजणीचे काम रेल्वे प्रशासन, शासकीय अधिकाऱ्यांकडून सुरू झाले आहे. या कामात अडथळे आणून रेल्वेकडून जमिनीचा दामदुप्पट मोबदला मिळविण्यासाठी ग्रामस्थ, दलाल आणि काही स्थानिक अधिकाऱ्यांनी या रेल्वे मार्गात, मार्गालगत बेकायदा निवारे उभारण्याचे काम अधिक प्रमाणात सुरू केले आहे.

कल्याण, मुरबाड तालुक्यातील ओसाड माळरान जमीन, जंगल भागात अचानक मोठ्या प्रमाणात लोखंडी पत्रे, पक्क्या बांधकामांचे निवारे उभारणीची कामे सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही बेकायदा बांधकामे करणाऱ्यांमध्ये ग्रामस्थ, जमीन व्यवहार करणारे मुरबाड, कल्याण भागातील दलाल, काही स्थानिक अधिकारी सहभागी असल्याचे जागरुक ग्रामस्थांनी सांगितले. नवी दिल्ली-जेएनपीटी(उरण) समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्गातील बाधितांना दामदुप्पट मोबदला रेल्वे प्रशासनाने दिला. रेल्वेकडून मजबूत मोबदला मिळत असल्याने मुरबाड परिसरातील दलालांनी स्थानिक शेतकऱ्यांना हाताशी धरून प्रस्तावित आंबिवली-मुरबाड रेल्वे मार्गात बांधकामे आहेत हे दाखविण्यासाठी पत्र्यांचे निवारे उभारण्याची कामे हाती घेतली आहेत.

हेही वाचा – कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पावसाची हजेरी

काही लोकप्रतिनिधीही आपल्या समर्थकांना अशाप्रकारची बेकायदा बांधकामे करण्यास पाठबळ देत असल्याच्या तक्रारी आहेत. रेल्वे मार्गाचा आराखडा बघून काही राजकीय मंडळी, मातब्बर ग्रामस्थांनी रेल्वे मार्गालगतच्या जमिनी खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. सध्या ‘दबदबा’ असलेल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अशी बांधकामे करण्यात आघाडीवर आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

या बेकायदा कामांमुळे लोखंड, पत्रे विक्रेत्यांचे भाव वधारले आहेत. सुतार काम करणाऱ्या मेस्तरींच्या दरात वाढ झाली आहे. रेल्वेचे भूसंपादन, सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली पाहिजेत तरच आपणास मोबदला मिळेल, अशी दिशाभूल करणारी माहिती दलालांकडून शेतकऱ्यांना दिली जात आहे. काही शेतकऱ्यांचे सातबारे काही मध्यस्थांनी आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. मोबदला आला की तो थेट तुम्हाला मिळेल याची व्यवस्था आम्ही करू, असे खोटी माहिती मध्यस्थ स्थानिक शेतकऱ्यांना देत आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीतील गणेश मंदिराच्या शताब्दी महोत्सवाला प्रारंभ, वर्षभर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

बेकायदा बांधकामे

आंबिवली, मानिवली, रायते, गोवेली, बापसई, कोळींब, मामणोली, म्हसरोंडी, पोटगाव, माळीपाडा, देवपे या प्रस्तावित रेल्वे मार्गावर सर्वाधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. कल्याण-मुरबाड मार्गावरील आंबिवली-मुरबाड मार्गाला अलीकडेच मंजुरी मिळाली. ८३६ कोटी खर्चाचा हा मार्ग आहे. रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गिकेसाठी १०० कोटींची तरतूद आहे. या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आंबिवली-मुरबाड पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्ग प्रस्तावित झाला, त्याचवेळी रेल्वेने त्या मार्गाचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण केले. त्या भागातील जमिनींचे दस्तऐवज, बांधकामे याची माहिती यापूर्वीच रेल्वेने ताब्यात घेतली आहे. आता कोणी मोबदला घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने प्रयत्न करत असेल तर ते मान्य केले जाणार नाही.” असे कल्याण, उप विभागीय अधिकारी अभिजित भांडे – पाटील म्हणाले.