डोंबिवली – ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर कल्याण डोंबिवली पालिकेने तीन ते चार वर्षापूर्वी महापुरूष, राष्ट्रीय खेळाडू, सन्मानिय व्यक्ति यांच्या प्रतिमा काढून घेतल्या आहेत. शहराच्या प्रवेशद्वारावर एक प्रसन्न वातावरण असावे हा यामागील मुख्य उद्देश होता. परंतु, एका स्थानिक जमीन मालकाने संरक्षक भिंती लगत पालिकेच्या फ प्रभाग, नगररचना विभागाची परवानगी न घेता काही दिवसापूर्वी बेकायदा गाळ्यांची उभारणी केली होती. ही माहिती मिळताच फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी संबंधित गाळे आणि लगतची पदपथ आणि संरक्षण भिंतीलगतची अतिक्रमणे बुधवारी भुईसपाट केली.
अचानक झालेल्या या कारवाईने ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागात पदपथ अडवून बसलेल्या विक्रेत्यांची दाणादाण उडाली. ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागात सुशोभित करण्यात आलेल्या भिंतीलगत लोखंडी प्रवेशद्वार बसवून बेकायदा गाळे उभारण्याची कामे सुरू आहेत. या गाळ्यांचे पक्के बांधकाम केले जात आहे, अशा तक्रारी डोंबिवलीतील फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या.
९० फुटी रस्त्यावरील सुशोभित करण्यात आलेल्या संंरक्षक भिंतीला यामुळे धोका निर्माण करण्यात आला होता. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना या बेकायदा गाळ्यांमुळे महापुरूष, राष्ट्रपुरूष, साहित्यिक, सन्मानिय व्यक्ति यांच्या ९० फुटी रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर काढण्यात आलेल्या प्रतिमा खराब होण्याची शक्यता वाटली. या गाळेधारकाने पालिकेची परवानगी घेतली आहे का, याची माहिती साहाय्यक आयुक्तांनी घेतली.
या गाळ्याला पालिकेची बांधकाम परवानी नसल्याने आणि या बेकायदा गाळ्यामुळे महापुरूषांच्या प्रतिमा रंगविलेल्या भिंती खराब होण्याची शक्यता होती. त्यामुळे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी तातडीने प्रभागातील तोडकाम पथक पाचारण केले. आणि सुरू असलेले बेकायदा गाळ्यांचे बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केले. या गाळ्याला जोडून नंतर इतर भूमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारली असती. त्यामुळे हा बेकायदा गाळा तात्काळ तोडून टाकण्यात आला, अशी माहिती साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी दिली.
९० फुटी रस्त्याचे रूंदीकरण आणि विस्तारीकरण झाले त्यावेळी या रस्त्याखाली गेलेल्या जमिनीचा आपण मोबदला घेतला नव्हता, असे निवेदन बेकायदा गाळा उभारणाऱ्या गाळेधारकाने पालिकेला दिले आहे. या अर्जाचा विचार करून आपण गाळे उभारणाऱ्या मालकावर एमआरटीपीचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला नाही, अशी माहिती मुंबरकर यांनी दिली. डोंबिवली शहरात प्रवेश करताना रस्ते, पदपथ मोकळे असावेत म्हणून ९० फुटी रस्ता, चोळे, खंबाळपाडा भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील विक्रेते, फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जात आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरच्या आतील सर्व फेरीवाले यापूर्वीच हटविण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबरकर यांनी दिली. कारवाई केल्याने फेरीवाल्यांकडून काहींची उपजीविका होत नाही. त्यांना काही मिळत नाही त्यामुळे असे अस्वस्थ अंतरात्मे आपल्या विरूध्द समाज माध्यमांमध्ये मजकूर प्रसिध्द करत आहेत. अशांविरूध्द आपण पोलीस ठाण्यात तक्रार आणि कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले.
