ठाणे : भिवंडी निजामपूर शहर महापालिका क्षेत्रातील बेकायदा नळजोडण्यांविरोधात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गेल्या काही महिन्यांपासून मोहिम हाती घेतली असून यामध्ये बेकायदा नळजोडण्या शोधून त्या तोडण्याबरोबरच संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात येत आहे. अशाचप्रकारे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने शहरातील कोंबडपाडा परिसरातील चाळींकरिता घेण्यात आलेल्या दोन बेकायदा नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई केली. याप्रकरणी पालिकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी निजामपूर शहर महापालिका क्षेत्रातील जलवाहिन्यांना छिद्र पाडून त्याद्वारे बेकायदा नळजोडण्या घेतल्या जात आहेत. अशा जोडण्यांमुळे पाणी चोरी होण्याबरोबरच काही ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होतो. याशिवाय, पाणी चोरीमुळे पालिकेचा महसुल बुडतो. हि बाब लक्षात घेऊन भिवंडी निजामपूर शहर महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी अशा बेकायदा नळजोडण्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांनी अशा बेकायदा नळजोडण्या शोधून त्या खंडीत करण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या जात असून त्याआधारे पोलिस संबंधितांवर गुन्हा दाखल करीत आहेत. अशाचप्रकारची कारवाई शहरातील कोंबडपाडा परिसरात कारवाई करण्यात आली आहे.

भिवंडी शहरातील कोंबडपाडा भागात पालिकेच्या पथकाने पाहणी केली असता, त्यावेळी येथील नाल्यामधून महापालिकेच्या संगमपाडा येथील जलकुंभाकरिता टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहीनीला रवी गायधर सिंह यांनी पालिकेच्या परवानगीविना बेकायदा नळजोडणी घेतल्याचे दिसून आले. १ व्यासाचे २ नळ कनेक्शन नाल्यातून आणि कामवारी नदीतून ग्रामीण भागातील नेहा पार्क, मीठ पाडा येथील चाळीकरीता बेकायदेशीपणे घेतले होते. अधिक चौकशीत १ लाख ९२ हजारांची पाणी चोरी गेल्या चार वर्षात करण्यात आल्याचे उघड झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पालिका प्रशासनाने रवी सिंह याच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार निजामपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सरफराज अंसारी यांच्या अधिपत्याखाली पथक प्रमुख विराज भोईर यांच्यामार्फत करण्यात आली.