पक्षीगणनेतील निष्कर्ष; कुरव, सुरथ, सागरी बगळय़ा, तुताऱ्या, रानपक्षीही आढळले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत राहण्यासाठीची जागा कमी पडू लागल्याने आणि खिशाला परवडेनाशी झाल्यामुळे ज्याप्रमाणे मुंबईकरांनी वसई-विरार पट्टय़ात स्थलांतर केले, त्याचप्रमाणे या पट्टय़ातील निसर्गसंपदा पक्ष्यांनाही आकर्षित करणारी ठरली आहे. त्यामुळे रविवारी वसईत झालेल्या पक्षीगणनेदरम्यान निरीक्षकांना स्थलांतरित आणि प्रवासी पक्षी मोठय़ा प्रमाणात आढळले. युरोपातील थंडीमुळे तेथून प्रयाण करणाऱ्या पक्ष्यांनी वसई पट्टय़ात आश्रय घेतल्याचेही या निमित्ताने दिसून आले.
महान पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या ११९ व्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी देशव्यापी पक्षीगणना आयोजित केली होती. ‘नेस्ट’ या आयबीसीएन संस्थेच्या सहयोगी संस्थेने रविवारी वसईतही हा उपक्रम पार पडला. रविवारी सकाळपासून पक्षीप्रेमींनी वसईतील विविध भागांतील पक्षी अधिवासांना भेट दिली. त्या वेळी कुरव (गल), सुरथ ( टर्न), सागरी बगळा, तुताऱ्या, अश्मान्वेशी, चिखले खार हे पक्षी त्यांना मुबलक प्रमाणात आढळले. पाणथळीच्या ठिकाणी चक्रवाक, धापटय़ा, प्लवा, ही रानबदके, ऑस्प्रे, दलदली हरिण कापशी असे शिकारी पक्षी, राखी बगळे, रंगीत करकोचे, चमचे करकोचे, मुग्धबलाक असे पाणपक्षी आढळले. जंगल परिसरात स्वर्गीय नर्तक, महाभृंगराज, हरियल, भारद्वाज, तपकिरी डोक्याचा तांबट, शिपाई बुलबुल, सुभग, हळद्या, तिपकंठी चिमणी, सुतार असे विविध रानपक्षीही गणनेदरम्यान दिसून आले. समुद्रकिनारी स्थलांतरीत पक्षी मोठय़ा संख्यने आढळून आले.
हिवाळ्यात युरोप, सायबेरिया, फिनलंड यांसारख्या शीतकटीबंधीय प्रदेशात बर्फवृष्टी होत असते. त्यामुळे तेथील अनेक पक्षी भारतासारख्या उष्ण कटिबधीय प्रदेशात स्थलांतरित होत असतात. ते अनेक पक्षी वसई परिसरात आल्याचे नेस्ट संस्थेचे अध्यक्ष सचिन मेन यांनी सांगितले. वसईत झालेल्या पक्षीगणनेसाठी पक्षी निरीक्षकांचे छोटे छोटे गट बनवण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही यंदा सामावून घेण्यात आले होते.
देशभरात पक्षीगणना होत असून त्याची माहिती एकाच वेळी संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातील विविध पक्ष्यांच्या प्रजातीबद्दल माहिती मिळू शकणार आहे. नेस्टचे पक्षीमित्र अमोल लोपीस, डॉ. मंगेश प्रभुलकर, सचिन पाटेकर, निकेतन कासारे, गिरीश चोणकर आदींनी पक्षीगणनेची मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immigrants birds in vasai virar
First published on: 17-11-2015 at 11:15 IST