अंबरनाथमधील कानसई विभागातील बालविकास मंदिर ही शाळा ‘रणदिवे बाईंची’ शाळा म्हणून ओळखली जाते. १९६२ मध्ये सुनीता पद्माकर रणदिवे यांनी त्यांच्या घराच्या व्हरांडय़ात ही शाळा सुरू केली. रणदिवेबाई आणि त्यांनी स्थापन केलेल्या या शाळेविषयी मनात नितांत आदर असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी तीन वर्षांपूर्वी पंचाहत्तरीनिमित्त आपल्या या शिक्षिकेचा हृद्य सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना रणदिवेबाईंनी माजी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनात लक्ष घालण्याचे आवाहन केले. त्यानुसार काही माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी उचलली. सध्या एकूणच मराठी शाळांची पीछेहाट सुरू असताना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून तळागाळातील विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीचे प्राथमिक शिक्षण विनामूल्य देण्याची योजना ‘बालविकास’च्या या नव्या कार्यकारिणीने हाती घेतली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
दत्तक योजनेतून विनामूल्य शिक्षण
या शाळेत सध्या पहिली ते सातवीचे २०० विद्यार्थी शिकत आहेत. इंग्रजी शाळेचे प्रस्थ वाढल्याने मध्यंतरीच्या काळात या शाळेचा पट रोडावला होता. त्यामुळे कार्यकारिणीत सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी पट वाढण्यासाठी विविध योजना राबविल्या. दत्तक विद्यार्थी योजना राबवून शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलास दप्तर, वह्य़ा, पुस्तके, गणवेश विनामूल्य देण्याचा उपक्रम सुरू केला. शाळेचा पट वाढू लागला आणि गरजू मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळू लागले.
रोटरीची मदत
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ या संस्थेने ‘स्मार्ट स्कूल’ उपक्रमांतर्गत संस्थेला देणगी दिली. त्यातून शाळेची बाके, इ-लर्निग संच, स्वतंत्र वाचनालय आदी सुविधा शाळेत उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रंथालयात ५०० पुस्तके आहेत.गिरीश सोमणी, जगदिश हडप, जयंत कुलकर्णी, किरण रणदिवे, वैजयंती भागवत, पुरुषोत्तम कुलकर्णी हे कार्यकारिणी सदस्य तसेच मुख्याध्यापिका मेघना कुऱ्हाडे आणि शिक्षक शाळेला मदत करण्यासाठी  परिश्रम घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ambaranatha kanasai section child temple schools
First published on: 14-08-2015 at 02:23 IST