अंबरनाथः शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील नऊ शिक्षकांना ‘तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५-२६’ ने गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त पंचायत समिती अंबरनाथतर्फे आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा अंबरनाथ पश्चिमेतील महात्मा गांधी विद्यालय येथील सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी शाळांनाही गौरवण्यात आले.

दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील आदर्श शिक्षकांना पंचायत समितीच्या वतीने गौरवण्यात येते. यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अंबरनाथ पश्चिमेतील दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातील सभागृहात या कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अंबरनाथ पंचायत समितीने महाराष्ट्रात सर्वप्रथम इंग्रजी शिक्षण सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

आज शिक्षकांनीही नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा, असे आवाहन यावेळी आमदार किसन कथोरे यांनी केले. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मी आज जे काही झालो, ते माझ्या शिक्षकांमुळेच. शिक्षकांचा प्रत्येक विद्यार्थी घडवण्यात थेट वाटा असतो, असे मत यावेळी आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.

गटविकास अधिकारी पंडित राठोड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांत सहभागी होऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले. तर गटशिक्षणाधिकारी डॉ. विशाल पोतेकर यांनी प्रास्ताविक करताना शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात यशस्वी झालेल्या शाळांचा अभिमान आहे. त्यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.

पुरस्कारप्राप्त शिक्षक

अंजली अहिरे, विजया सोलसे, विजय जोगी, विद्या काबाडी, सीमा महाजन, वैशाली साळवी, तृप्ती अमोल पेन्सलवार, योजना डेंगाणे, सुनील संदानशिव यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शाळांचा सन्मान

या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आठ शाळांचा सुद्धा गौरव करण्यात आला.

यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १) कुळगाव-बदलापूर न.पा. शाळा क्र. १, २) जिल्हा परिषद शाळा उसाटणे., ३) अंबरनाथ न.पा. शाळा क्र. ५, ४) जिल्हा परिषद शाळा पादिरपाडा तर खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा १) होली रिट माध्यमिक स्कूल, बदलापूर, २) विद्या विकास स्कूल, वांगणी, ३) शिवभक्त विद्यालय, बदलापूर, ४) महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ यांचाही गौरव करण्यात आला.