डोंबिवली – डोंबिवली जवळील भोपर गाव हद्दीतील एका भूखंड विकासात ठाण्यातील एका विकासकाने व्यवसायात भागीदार असलेल्या डोंबिवलीतील एका कर सल्लागाराची २१ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी कर सल्लागाराने मानपाडा पोलीस ठाण्यात विकासका विरूध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.

गोविंद भिमजी पटेल (५७) असे तक्रारदार कर सल्लागाराचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील टिळक चौक भागात एका सोसायटीत राहतात. कर सल्लागार गोविंद पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ठाण्यातील मानपाडा चितळसर भागात राहत असलेल्या कांती रतनशी शहा यांच्या विरूध्द भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जून २००७ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीतील हा प्रकार आहे. डोंबिवली पूर्वेतील २७ गाव हद्दीतील भोपरगाव हद्दीतील सर्वे क्रमांक २३९-४ या भूखंड विकासातील हा व्यवहार आहे.

तक्रारदार कर सल्लागार गोविंद पटेल यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपला डोंबिवली जवळील भोपर गाव हद्दीत एक भूखंड होता. हा भूखंड विकसित करण्याची तयारी ठाण्याच्या विकासक कांती रतनशी शहा यांनी दर्शवली. रतनशी शहा यांनी भोपरचा भूखंड विकसित करण्यासाठी घेतला. यासंदर्भातचा विकसन करारनामा ६ जुलै २००७ रोजी दस्त नोंदणीकृत करण्यात आला.

भूखंड विकासाचा करारनामा तयार केल्यानंतर विकासक कांती शहा यांनी ठरल्या व्यवहाराप्रमाणे कर सल्लागार गोविंद पटेल आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून एकूण २१ लाख ९० हजार रूपये घेतले. भूखंड विकसन करार करताना अटीशर्ती ठरल्या होत्या. त्याप्रमाणे कांती शहा यांनी भोपरचा भूखंड विकसित करायचा होता. पण, विकसन करार झाल्यानंतर कांती शहा यांनी विकसन करारातील अटीशर्तींचे पालन केले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

विकासक कांती शहा यांनी करारनामा करताना कर सल्लागार गोविंद पटेल यांच्या सोबत भागीदारी केली होती. हा भागीदारीचा व्यवहार होता. त्यामुळे कांती शहा आणि गोविंद पटेल यांनी एकत्रित सहमहतीने पुढील सर्व व्यवहार आणि निर्णय घ्यायचे होते. पटेल, शहा यांच्यात संयुक्त भागीदारी करारनामा असताना कांती शहा यांनी तक्रारदार कर सल्लागार गोविंद पटेल यांची कोणतीही संमती न घेता परस्पर भोपर येथील भूखंड विकसित करण्यासाठी ईरा होम्सचे बिल्डर्स यांना दिला.

यासंदर्भात त्यांच्याशी करारनामा करून त्याचा मोबदला घेतला. या मोबदल्यातील कोणत्याही प्रकारची रक्कम कर सल्लागार व्यवहारातील भागीदाराला न देता त्यांची २१ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक ढोले याप्रकरणाचा तपास करत आहेत.