डोंबिवली – भारत सरकारच्या दिल्लीतील वित्त मंत्रालय, राजस्व विभाग, केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क विभागात आपणास कायमस्वरुपी नोकरी लावतो, असे आमिष दाखवून दहा जणांनी संगनमत करून डोंबिवली परिसरातील दहा बेरोजगार तरूणांकडून एकूण ४२ लाख रूपये उकळले. एका ज्येष्ठ नागरिकाला आपले वाहन कमी किमतीत विक्री करतो असे सांगून त्यांच्याकडून १७ लाख ३६ हजार रूपये वसूल केले. त्यानंतर नोकरी देण्याचे आणि वाहन विक्रीचे कोणतेही आश्वासन न पाळता मुंबई भागातील दहा जणांनी डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकासह १० बेरोजगार तरूणांची ५९ लाख ३६ हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

मार्च २०२२ ते जून २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणी डोंबिवली पूर्वेत वीर सावरकर रस्त्यावरील एका गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या भास्कर नारायण देवडे (६८) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली आहे. पोलिसांनी आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.

तक्रारदार भास्कर देवडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईत गोरेगाव येथील इंदिरानगर भागात राहणाऱ्या ४५ वर्षाच्या नोकरदारासह त्यांच्या नऊ साथीदारांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार देवडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यातील प्राथमिक माहिती अहवालात दिलेली तक्रार अशी, की मुंबईतील गोरेगाव येथे राहणारे ४५ वर्षाचे नोकरदार व्यक्ति आणि त्यांच्या नऊ साथीदारांनी आपल्या डोंबिवलीतील घरी येऊन आम्ही दिल्लीतील भारत सरकारच्या वित्त मंत्रालय, राजस्व विभाग, केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क विभाग, नाॅर्थ ब्लाॅक, दिल्ली येथे सीमा शुल्क विभागात कायमस्वरुपी सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले. टपाल तांत्रिक साहाय्यक या पदासाठी तक्रारदार देवडे यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, नोकरीच्या कामासाठी लागणारी आवश्यक महत्वाची शैक्षणिक मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली.

नोकरी लावण्याच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दहा तरूणांकडून टप्प्याने काही रक्कम रोख, काही ऑनलाईन माध्यमातून वसूल केली. दहा तरूणांकडून एकूण ४२ लाख रूपये दहा इसमांनी उकळले. तसेच, तक्रारदार देवडे यांना गुन्हा दाखल इसमाने आपली मोटार कमी किमतीत म्हणजे १७ लाख ३६ हजार ४०० रूपयांना विक्री करणार म्हणून गुन्हा दाखल इसमाने देवडे यांच्याकडून १७ लाख ३६ हजाराची रक्कम वसूल केली. त्यानंतर देवडे यांना इसमाने मोटारीचा ताबा दिला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाप्रकारे तक्रारदार आणि इतर दहा जणांकडून एकूण ५९ लाख ३६ हजार रूपये गु्न्हा दाखल दहा इसमांनी उकळले. त्यानंतर दहा तरूणांना आम्ही तुम्हाला नोकरीची पदस्थापना देत आहोत, असे खोटे दाखवून तरूणांना नोकरीची बनावट नियुक्ती पत्रे, बनावट ओळखपत्रे, बनावट मुलाखत पत्रे, बनावट कार्यालयीन प्रवेश पास दिले. तसेच, सरकारी निवासाच्या पाच पाच तरूणांच्या पाच चाव्या तयार करून तक्रारदार यांना देऊन, एकूण अकरा जणांची आर्थिक फसवणूक केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक घुटुगडे तपास करत आहेत.