डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावर मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान काही समाजकंटकांनी एक लोखंडी चहाची टपरी व्यवसाय करण्यासाठी आणून ठेवली होती. या टपरीमुळे या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती. तसेच, या टपरीच्या आधारे या भागात वर्दळीच्या रस्त्यावर टपऱ्या आणि हातगाड्या उभ्या राहण्याची शक्यता होती. स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांनी याप्रकरणी आवाज उठविताच पालिकेने ही टपरी बुधवारी जप्त केली आहे.

डोंबिवली शहरातील मुख्य वर्दळीच्या जागा, चौकांमधील रिकामे कोपरे राजकीय पाठबळ असलेल्या काही कार्यकर्त्यांनी टपरी, हातगाड्या लावून अडविण्यास सुरूवात केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या अपरोक्षक हे प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास केले जातात. या कार्यकर्त्यांची स्थानिक पातळीवर दहशत असल्याने या बेकायदा टपऱ्या, हातगाड्यांविषयी कोणी उघडपणे बोलत नाही.

मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी भागात मानपाडा रस्त्यावर चार जणांनी एक चहाची लोखंडी पत्र्यांनी बंदिस्त केलेली टपरी लोटत जयकुल आर्केड या निवासी इमारतीच्या दर्शनी भागात आणून उभी केली. सकाळी पदपथ आणि रस्त्या दरम्यान उभी केलेली ही टपरी पाहून स्थानिक रहिवासी, व्यापारी आश्चर्यचकित झाले. वर्दळीच्या रस्त्यावरील या चहाच्या टपरीवर चहा विक्री सुरू झाली तर मानपाडा रस्त्यावर कोंडी होईल. पादचाऱ्यांना चालताना अडथळे येतील, असा विचार करून जयकुल आर्केडमधील जागरूक रहिवासी कुलीनकांत जैन यांनी याप्रकरणी ग प्रभाग पालिका कार्यालय, टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या.

ही टपरी पालिकेने उचलू नये म्हणून या टपरीचे पाठीराखे जोरदार प्रयत्न करत होते. स्थानिक रहिवाशांनी पालिकेने ही टपरी हटवावी यासाठी जोरदार प्रयत्न केले. या टपरीच्या माध्यमातून मुख्य मोक्याची जागा बळकावण्याचे समाजकंटकांचे लक्ष्य होते. या टपरीच्या आडोशाने वडापाव, भाजीपाला व्यवसाय सुरू करण्याचे माफियांचे प्रयत्न होते. स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर बुधवारी दुपारी पालिका कर्मचाऱ्यांनी ही टपरी जप्त केली. ही टपरी अन्य भागात रस्ता अडवून कोठे उभी केली जाणार नाही याची दक्षता पालिका अधिकाऱ्यांनी घेण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. डोंबिवली पूर्वेतील स्कायवाॅकखाली, बाजीप्रभू चौकात महावितरण कार्यालयाच्या बाहेरील रस्ते, चौक अडवून काही इसमांनी टपऱ्या उभ्या केल्या आहेत. सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी या टपऱ्या उभ्या केल्याने या भागातून पादचाऱ्यांना चालणे अवघड होते. पादचारी, रिक्षा, बसची वाहतूक या भागातून सुरू असते. त्यांना या टपऱ्यांचा अडथळा येत आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बेकायदा सर्व टपऱ्या हटविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.