डोंबिवली: डोंबिवलीतून मुंबई, ठाणे येथे जाण्यासाठी बहुतांशी प्रवासी, वाहन चालक मोठागाव येथील माणकोली उड्डाण पुलाचा वापर करत आहेत. माणकोली पुलावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने हा भार डोंबिवलीत प्रवेश करताना मोठागाव येथे लागणाऱ्या रेतीबंदर रेल्वे फाटकावर येत आहे. त्यामुळे या भागात वाहनांच्या दररोज रांगा लागत आहेत. रेल्वे फाटकातून जाण्यासाठी वाहन चालक वाट्टेल तशी वाहने या रस्त्यावर उभी करत असल्याने या भागात पत्री त्रिशंकु रस्ता दुभाजक ठेवण्यात आले आहेत.
रेतीबंदर रेल्वे फाटकाजवळील रस्ता अरूंद आहे. या रस्त्याच्या एका बाजुला पालिकेची पाच ते सहा आरक्षणे आहेत. या मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी यापूर्वीच बेकायदा इमारती, गाळे बांधून हा रस्ता बाधित केला आहे. त्यामुळे पालिकेला या रस्ते भागात अनेक वर्ष रूंदीकरण करता आलेले नाही. या रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढल्याने हा अरूंद रस्ता सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कोंडीत अडकत आहे.
हेही वाचा : ठाणे – बेलापूर वाहतूक कोंडी, घणसोली स्टेशन समोर ट्रक पलटी
जुनी डोंबिवली, मोठागाव, रेतीबंदर भागात जाणाऱ्या स्थानिकांची दुचाकी, रिक्षा, खासगी वाहने या वाहनांमध्ये आता माणकोली पुलावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने या भागातील वाहन संख्या आणि कोंडी दिवसेंंदिवस वाढत आहे. दिवा-पनवेल आणि भिवंडी रेल्वे मार्गावर रेतीबंदर रेल्वे फाटक आहे. या रेल्वे मार्गातून लांब पल्ल्याची एक्सप्रेस, मालगाडी गेल्या शिवाय रेल्वे फाटक नियंंत्रकाला फाटक खुले करता येत नाही. त्यामुळे डोंबिवली बाजुला उमेशनगर, दिनदयाळ रस्त्यापर्यंत वाहनांचा रांगा लागतात. खाडी किनारी बाजुला नवनाथ मंदिरापर्यंत अनेक वेळा वाहनांचा रांगा लागतात.
सकाळच्या वेळेत मुंबई, ठाणे, नाशिककडे जाणारे प्रवासी, मालवाहतूकदार, व्यावसायिक डोंबिवलीतून माणकोली पूल मार्गे इच्छित स्थळी जातात. या पुलामुळे दुर्गाडी पूल, कोन, भिवंडी बाह्यवळण रस्ता, शिळफाटा रस्त्यावरील कोंडीला टाळून प्रवाशांना इच्छित निश्चित वेळेत जाता येते. डोंबिवलीतून ठाण्यात जाणारा प्रवासी माणकोली पुलावरून अर्धा तासात पोहचतो. हाच प्रवासी मुंबईत एक तासाच्या आत पोहचतो. त्यामुळे नोकरदार वर्ग या पुलाला सर्वाधिक प्राधान्य देत आहे.
हेही वाचा : भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त
रेतीबंदर रेल्वे फाटक भागात रेल्वेकडून उड्डाण पुलाची उभारणी होणार आहे. त्यासाठी बराच काळ जाणार असल्याने या भागात पालिका, वाहतूक विभागाने वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. डोंबिवली बाजूकडील माणकोली पुल ते रेतीबंदर रेल्वे फाटक दरम्यानचा मोठागाव मलनिस्सारण केंद्राकडून येणाऱ्या रस्त्याचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.