कल्याण: पाऊस सुरू झाल्यानंतर मुलीकडे जाता येणार नाही, असा विचार करून आई सुनिता गुजर (७८) या कल्याणमधील श्री सप्तश्रृंगी इमारतीमध्ये राहत असलेल्या सुनिता गुजर (३६) या आपल्या मुलीकडे इमारत दुर्घटना घडली त्या दिवशी आल्या होत्या. आपली आई आपल्या बहिणीकडे आली म्हणून कल्याणमध्ये राहत असलेली सुनिता गुजर यांची दुसरी मुलगी आईच्या भेटीसाठी श्री सप्तश्रृंगी इमारतीत आईच्या भेटीसाठी आली होती. आई आणि दोन लेकी घरातील सभागृहात बऱ्याखुशालीच्या गप्पा मारत असताना अचानक चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळला. आईसह दोन्ही लेकींचा मृत्यू झाला.
घरात आजी आणि मावशी आली म्हणून आनंदीत झालेली सुनिता यांची मुलगी श्रध्दा साहु (१४) स्वयंपाक घरात दोघींना पाणी आणण्यासाठी गेली म्हणून सुदैवाने ती बचावली. स्वयंंपाक घरात असताना श्रध्दा घरातील सभागृहात कसला आवाज झाला म्हणून पाहण्यासाठी बाहेर आली तेव्हा तिला घराचा पृष्ठाचा स्लॅब कोसळल्याचे आणि त्या खाली आपली आजी, आई आणि मावशी अडकल्याचे समजताच श्रध्दाने हंबरडा फोडला. स्वयंपाक घरात अडकून पडल्याने तिने खिडकीत येऊन बचावासाठी ओरडा केला.
स्वयंपाक घरातून बाहेर येण्यासाठी मार्ग असलेला सभागृहातील स्लॅब कोसळला होता. त्यामुळे श्रध्दा बाहेर येऊ शकत नव्हती.इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर साहु कुटुंबीय राहत होते. बऱ्या खुशालीच्या माय लेकींच्या गप्पा रंगात असताना अचानक दुपारच्या वेळेत स्लॅब कोसळला. आईसह दोन्ही लेकींचा स्लॅबखाली दडपून मृत्यू झाला. सुशीला यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
आपल्या लेकींच्या भेटीसाठी आलेल्या सुनिता गुजर या पाहुण्या म्हणून आल्या होत्या. लेकीकडे दोन दिवस राहून मग पुन्हा आपल्या मूळ गावी जाण्याचे सुनिता गुजर यांचे नियोजन होते. तत्पूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. आपल्या समोरच आपली आजी, मावशी आणि आईचा मृत्यू झाल्याने चौदा वर्षाची श्रध्दा हादरली आहे.
पाऊस पाण्याचे वयोमानामुळे लेकीकडे जाता येत नाही म्हणून अनेक वयोवृध्द महिला पाऊस सुरू होण्यापूर्वीच लेकी, नातवंडांच्या भेटीसाठी निघतात. असा दिवस आपल्या वाट्याला येईल असे सुनिता यांना वाटले नव्हते. श्री सप्तश्रृंगी इमारतीमध्ये मायलेकींच्या या एकत्रित मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.