कल्याण – कल्याणमधील बाजारपेठ पोलिसांनी गेल्या महिन्यात पत्रीपूल भागातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कोडेन फाॅस्फेट सिरप या प्रतिबंधित अंमली पदार्थांची तस्करी करताना तीन जणांना अटक केली होती. या तीन जणांकडून १२० कोडेन फाॅस्फेट सिरपच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या अटक प्रकरणातील एक इसम हा कर्नाटक राज्यातील एक मंत्री, एक आमदार यांच्या खास मर्जीतील इसम असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
या अटक प्रकरणाने कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यात संबंधित राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लिंगराज कन्नी उर्फ अपराय आलगुड (४०) असे या इसमाचे नाव आहे. हा इसम कर्नाटक राज्यातील उदयनगर भागातील न्यू जेवरगी भागात अलिशान वस्तीत राहतो. तो एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून ओळखला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
कोडेन फाॅस्फेट सिरपच्या १२० बाटल्या तस्करी प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी जप्त केल्या होत्या. गेल्या महिन्यात रात्री पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयाजवळील बकरी मंडई रस्ता भागात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील बाजुस छापा टाकून पोलिसांंनी ही कारवाई केली होती. यामध्ये कल्याणमधील बाजारपेठ गोविंदवाडी भागात कुदरत मंजिलमध्ये राहणारा तौसिफ आसिफ सुर्वे (३४), इरफान उर्फ मोहसीन इब्राहिम सय्यद (३४) या कर्नाटकातील चवडेश्वर वसाहत भागातील लालगिरी मस्जिदजवळील भागात राहणारा इसमाला आणि कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील लिंगराज आलगुड यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २७ हजार रूपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. या तिघांविरुध्द हवालदार अमित शिंदे यांनी अंमली पदार्थ तस्करी अधिनियमाने गुन्हा दाखल केला होता.
या तिघांना अटक करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड याप्रकरणाचा तपास करत आहेत. तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर यामधील एक जण पोलिसांना तो राजकीय प्रभावशील व्यक्तिंशी संबंधित असल्याचे माहिती नव्हते. दोन दिवसांंपासून कर्नाटक राज्यातून लिंगराज कन्नी याला कल्याण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समाज माध्यमातून प्रसारित झाली. त्यानंतर लिंगराज हा कर्नाटकातील काही राजकीय प्रभावशील व्यक्तिंशी संबंधित इसम असल्याचे पुढे आले आहे. ही माहिती ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. कर्नाटकातील एक राजकीय पक्षाशी संबंधित इसम अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात कल्याणमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.