कल्याण – कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका येथून एका वृत्तपत्र विक्रेता महिलेची सतरा हजार रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज असलेली पिशवी अज्ञात इसमाने एका दुकानाबाहेरील मंचकावरून चोरून नेली आहे. बुधवारी सकाळी सात ते साडे सात वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे.
वंदना सुदाम उघडे (४५) असे या वृतपत्र विक्रेता महिलेचे नाव आहे. त्या कल्याण पूर्वेतील मंगल राघोनगरमधील साईबाबा मंदिर परिसरातील सोसायटीत राहतात. बुधवारी सकाळी सात ते सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान तिसगाव नाक्यावरील सुजय मेडिकल दुकानाच्या जवळील एका मोबाईल दुकानाच्या बाहेर हा चोरीचा प्रकार घडला आहे. एका अज्ञात इसमाने ही चोरी केली असण्याचा संशय वंदना उघडे यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.
वृत्तपत्र विक्रेत्या महिला अनेक वर्षापासून कल्याण पूर्व भागात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. वंंदना उघडे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका भागातील सुजय मेडिकल दुकानाजवळील भानुशाली मोबाईल दुकानाच्या बाहेर असलेल्या एका मंंचकावर आपली पाठीला लावण्याची पिशवी ठेवली होती. या पिशवीत १७ हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी, वृत्तपत्र विक्रीतून मिळालेली रोख रक्कम आणि काही महत्वाची कागदपत्रे होती.
मंचकावर पिशवी असताना आपली नजर चुकवून अज्ञात इसमाने ती पिशवी चोरून नेली. कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हवालदार बोरसे तपास करत आहेत.