ठाणे : महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बसविण्यात आलेल्या १४०० पैकी ३०० सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आली असून ही बाब नियंत्रण कक्षाच्या पाहणीदरम्यान निर्दशनास येताच नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच नियंत्रण कक्षाचे कामकाज नेमके कसे चालते, याविषयी आयुक्त राव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संबंधित कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आणि यानंतर आयुक्त राव यांनी त्यांना फैलावर घेऊन त्यांची कानउघाडणी केली, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर सोनसाखळी चोरीचे प्रकार काही वर्षांपुर्वी वाढले होते. त्याचबरोबर भामट्यांकडून बोलण्यात गुंतवून पैसे लुटून नेण्याचे प्रकारही वाढले होते. अशा रस्त्यावरील गुन्ह्यांना आळा बसावा आणि त्याचबरोबर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशातून ठाणे शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची योजना पालिकेने राबविली. या योजनेतून ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने १ हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जात असते. त्याचा फायदा शहरातील विविध गुन्ह्यांच्या तपास कामामध्ये पोलिसांना या कॅमेऱ्यांचा उपयोग झालेला असून त्या माध्यमातून त्यांना गुन्हेगारांचा माग काढून त्यांना पकडणे शक्य झाले आहे. याशिवाय, नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शहराच्या विविध भागात आणखी ४३ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय प्रशासनाने नुकताच घेतला आहे. असे असतानाच, शहरात यापुर्वी बसविण्यात आलेल्या १४०० पैकी ३०० सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आली आहे.
हेही वाचा : प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पावसाळ्यापुर्वी कामांचा आढावा घेण्यास सुरूवात केली असून त्याचबरोबर त्यांनी हाजुरी येथील नियंत्रण कक्षाची पाहाणी करून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शहरातील तीनशे कॅमेरे बंद असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. शिवाय, मुंब्रा येथील एकाच भागात कॅमेरे सुरू असल्याचेही निदर्शनास आले. कॅमेऱ्याला जोडण्यात आलेल्या तारा तुटल्या असून त्या जोडणीचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाक़डून यावेळी त्यांना देण्यात आली. तसेच नियंत्रण कक्षाचे कामकाज नेमके कसे चालते. नागरिकांकडून आलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे कशा पाठविल्या जातात आणि त्यावर कशाप्रकारे कार्यवाही होते, असे अनेक प्रश्न आयुक्तांनी तेथील कर्मचाऱ्यांना विचारले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांना त्याबाबत उत्तरे देता आली नाहीत. यावरून नाराजी व्यक्त करत आयुक्त राव यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेऊन त्यांची कानउघाडणी केली, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अदययावत नियंत्रण कक्षाचा वापर वाढवून कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीचा अर्लट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होण्याची वाट पाहाण्याऐवजी नियंत्रण कक्षातील कॅमेरेद्वारेच माहिती घेऊन त्या तक्रारींचे निराकारण करा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.