ठाणे : राज्यातील महापालिकेचे कबड्डी संघ असून त्यातील कबड्डीपटू कंत्राटवर आहेत. त्यांना पालिका सेवेत कायम करण्यासाठी धोरण तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. वर्तकनगर येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरी येथे प्रशांत जाधवर फाऊंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळाच्या वतीने कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवंगत आनंद दिघे यांनी नेहमी खेळाडूंना प्रोत्साहन दिले होते. त्यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करण्याचे काम केले. तसेच सरकारने खेळाला नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यात अगदी दहीहंडीपासून ते कबड्डीपर्यंतच्या खेळांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ठाणे महापालिकेचा कबड्डी संघ आहे. त्यातील खेळाडूची कंत्राटी स्वरुपात नेमणुक करण्यात आली आहेत. या खेळाडूंना पालिका सेवेत कायम करण्याच्या सुचना पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील महापालिकांमध्येही अशा स्वरुपाचा निर्णय घेण्यासाठी धोरण ठरविण्यात येईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा : बदलापुरातील वालिवली पूल वाहतुकीसाठी बंद

या स्पर्धेतील कुमार गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघाने विजयासह नारायण नागु पाटील स्मृती फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. तर या गटात पिंपरी चिंचवडचा संघ उपविजेता ठरला. कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघाने प्रथम क्रमांकासह क्रीडाशिक्षक चंदन सखाराम पांडे स्मरणार्थ फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. तर पुणे ग्रामीण संघाने उपविजेतेपद पटकाविले. कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम संघाने पिंपरी चिंचवड संघावर २७-१५ अशी मात करीत विजय मिळविला, मध्यंतराला मुंबई उपनगर पुर्व संघाकडे १०-८ अशी नाममात्र आघाडी होती.

हेही वाचा : ठाणे: मेट्रोच्या कामादरम्यान गर्डरवरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सुरवातीपासुन एकमेकांना अजमावत सावध खेळ करीत होते. मध्यंतरानंतर पिंपरी चिंचवडच्या संघाचा अनुभव कमी पडला आणि उपनगर पश्चिमचे आक्रमण थोपविण्यासह बचाव भेदण्यात यशस्वी झाले नाहीत. मुंबई उपनगर पश्चिमच्या रजत सिंग व ओम कुडले यांनी सुरवातीपासुनच आक्रमक खेळ केला. कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघाने पुणे ग्रामीण संघावर ४४-२७ अशी मात करीत स्पर्धेचे विजेतपद मिळविले. पिंपरी चिंचवड संघाच्या मनिषा रोठोड व आर्या पाटील यांच्या खेळाने पुणे ग्रामीण संघावर सहज विजय मिळविला. पिंपरी चिंचवडच्या सिफा वस्ताद व भूमिका गोरे यांनी चांगल्या पकडी घेत विजयात म्हत्त्वाची भूमिका बजावली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane cm eknath shinde will decide policy for kabaddi players for permanent sevice at municipal corporation css