ठाणे : बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेऊन काम केले असते तर, नरक किंवा स्वर्गाला नरक पाहण्याची वेळ आली नसती, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला. काँग्रेसबरोबर जाण्याचे पाप केले आणि ते पाप लपविण्यासाठी किती वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय बाळासाहेबांनी खुलेपणाने घेतला होता. मोदी आणि शहा यांनीही बाळासाहेबांवर प्रेम केले आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवली. त्या काळात त्यांनी एकमेकांच्या पाठीमागे उभे राहण्याचे काम केले, असे शिंदे म्हणाले. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केल्यामुळेच आम्हाला दुसरे पाऊल उचलावे लागले. आमच्या कृतीचे जनतेने स्वागत केले, असे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. किती वेळ तुम्ही तुमचे पाप लपवणार, तुम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार राहिलेले नाही, असेही ते म्हणाले. ‘

इंडिया’ आघाडी लोकसभेनंतर तुटली असून ती कुठे आहे. ‘इंडिया’ आघाडीतील नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून, ते भारतीय लष्कराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, असेही ते म्हणाले. दहशतवादी हल्ला झाला तर ते युद्ध समजले जाणार, असे मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ दहशतवाद संपत नाही, तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.