Shiv sena News : ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लाडकी बहीण योजना राबविली. ही योजना राज्यात लोकप्रिय झाली असून ती आजही सुरू आहे. या योजनेचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच, शिवसेनेने ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ अभियान सुरू केले असून त्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ठाण्यात झाला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभियानाबाबत माहिती दिली.

शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी ‘ खेळ मंगळागौरीचा २०२५’ हा कार्यक्रम रविवारी ठाण्यात आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिवसेनेच्या ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे या सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत अभियानाबाबत माहिती दिली.

जशी आपली मुलगी दुसरीकडे नांदते, तशीच दुसऱ्याची मुलगी आपल्याकडे सून म्हणून नांदते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जशी लेक लाडकी असते, लाडकी बहीण असते, तशीच लाडकी सून असं वातावरण सगळ्यांनी तयार करायला पाहिजे. यामुळेच आज मंगळागौर कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ अभियान सुरू करतोय. हे अभियान लाडक्या सुनेच्या मदतीसाठी आहे. जशी लाडकी बहीण आहे, लाडकी मुलगी आहे, तशी लाडकी सूनही सुरक्षित सून असायला हवी. त्यामुळे या अभियानासाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे, असे शिंदे म्हणाले.

शिवसेना शाखा महेर असेल

सर्व बहिणींना सांगू इच्छितो, समाजामध्ये काही महिला दबावाला बळी पडून टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवण्याचा अतिशय टोकाचा निर्णय घेतात. त्या सर्वांना माझी विनंती आहे की, या सर्व सुनांचं जे काही सुरक्षित ठिकाण असेल, ते म्हणजे शिवसेना शाखा. शाखा हे त्यांचं माहेर असेल. शाखा हे आपलं जे न्याय मंदिर आहे आणि म्हणूनच शाखेतून त्यांना मदत मिळेल, असा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. मी दिलेला शब्द कधी मी मोडत नाही. बाकी तुम्हाला माहित आहे, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केले आहेत. श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत पण, मी डॉक्टर नसलो तरी मोठे मोठे ऑपरेशन केले आहेत आणि कुणाचा कधी करेक्ट कार्यक्रम करायचा, तोही करत असतो. मी शब्द देतो तो पाळतो. म्हणून ५० आमदार माझ्या सीबत आले, सात मंत्री सत्ता सोडून आले आणि मीही सत्ता सोडून दिली, असे शिंदे म्हणाले.

…तर त्याची गाठ शिवसेनेची असेल

ज्या महिला अडचणीत असतील, त्यांनी न घाबरता हेल्पलाईनवर कॉल केला पाहिजे. त्यांनी दिलेली माहिती कुठेही लीक होणार नाही आणि ती तेवढीच सुरक्षित राहील. तसेच त्या आपल्या लाडक्या बहिणीला ताबडतोब मदत देण्याचे काम ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ अभियान करेल. कारण, शेवटी ज्या ज्या सुना, ज्या ज्या घरात राहताय, त्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांचा भाऊ हा एकनाथ शिंदे आहे. त्या ठिकाणी कोणीही असा अन्याय अत्याचार करेल तर त्याची गाठ शिवसेनेची असेल, हे मी याठिकाणी सांगू इच्छितो, असेही शिंदे म्हणाले.

त्या सासूंचा सन्मान केला जाणार

आपण अत्याचाराच्या काही घटना पाहतो. शिवसेना ही नेहमी महिलांच्या रक्षणासाठी उभे राहते, आपल्या लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी उभी राहते. त्यामुळेच शिवसेनेने ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ हे अभियान सुरू केले आहे. लाडक्या सुनेचे रक्षण अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. ज्या ज्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडतील, त्या त्या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या रणरागिनी मदतीला पोहोचतील. धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळात देखील ज्या ज्या ठिकाणी अशा अन्याय अत्याचाराच्या घटना घडत होत्या, त्यांना त्या ठिकाणी तात्काळ दिलासा देण्याचे काम दिघे करायचे. त्यांना न्याय देण्याचे काम करायचे. मी ज्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी त्या कुटुंबांनी आवर्जून आनंद दिघे यांचे नाव घेतले. ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रम मधून या ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ अभियानाची सुरवात होत आहे. तसेच ज्या सासू आपल्या सुनांना चांगलं सांभाळतात, त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम घेतला जाईल. जेणेकरून इतर लोकांनाही तो आदर्श ठरेल, असे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.