ठाणे – शहरात गेल्या महिनाभरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटण्याचे, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांनंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून उर्वरित धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येते. या छाटणीनंतर हा हरित कचरा रस्त्याच्या कडेला ठेवण्यात येतो. या कचऱ्याची उचल वृक्ष प्राधिकरण विभागाने करणे आवश्यक आहे. परंतू, गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील पदपथांवर आणि रस्त्याच्या कडेला हा हरित कचरा तसाच पडून आहे, ज्यामुळे नागरिकांना चालताना अडथळा निर्माण होत आहे.

पावसामुळे ठाणे शहरात गेल्या महिन्याभरात २७ ठिकाणी वृक्ष उन्मळून तर, पाच ते सहा ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाडे नोंदविण्यात आली आहे. ठाणे शहरातील वसंतविहार, राबोडी, रघुनाथनगर, पोखरन रोड नंबर -२, पाचपाखाडी, चंदनवाडी, भास्कर कॉलनी, गावंडबाग, घंटाळी रोड, साकेत, फुले नगर, घोडबंदर भागातील बाळकुम, ब्रह्मांड, आनंदनगर, कापुरबावडी, कासारवडवली, वाघबीळ मानपाडा कावेसर, कळवा येथील पारसिक नगर, खारेगाव अशा विविध ठिकाणी झाडाच्या फांद्या आणि वृक्ष उन्मळून पडले आहेत. झाड किंवा झाडाची फांदी पडल्याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निश्मन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी धोकादायस्थिती असलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी करुन तो हरित कचरा रस्त्याच्याबाजूला किंवा पदपथावर तसाच ठेवला जातो.

ठाणे शहरातील स्थानक परिसराजवळ, नौपाडा, वागळे इस्टेट, सावरकरनगर, वर्तकनगर तसेच घोडबंदर भागातील अनेक ठिकाणी हा हरित कचरा पडल्याचे दिसत आहे. नौपाडा परिसरातील गोखले रोड परिसरात मोठ्याप्रमाणात झाडांच्या फांद्याचा ढीग लागल्याचे दिसत आहे. तर, काही ठिकाणी झाडांचा पालापाचोळा पसरला आहे. शहरात अनेक ठिकाणी अशाचप्रकारे पदपथांवर आणि रस्त्याच्याकडेला हा हरित कचरा पसरला असून नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. परंतू, तरी देखील ठाणे महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या कापलेल्या फांद्या गेले अनेक दिवसांपासून पदपथांवर आणि रस्त्याच्या एकाबाजूला पडलेल्या आहेत. त्यामुळे पदपथांवरुन चालणे कठीण होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ठाण्यातील एका नागरिकाकडून देण्यात आली. तर, वृक्ष किंवा फांदी पडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निश्मन विभाग केवळ धोकादायक फांदी छाटणीचे काम करतो. त्यानंतर, तो पालापाचोळा साफ करण्याचे काम हे वृक्षप्राधिकरण विभागाचे असते, अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.