ठाणे – सध्याच्या काळात ऑनलाईन पद्धतीने विवाह जुळवून संसार थाटण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसून येते. आपल्यासाठी योग्य तो जोडीदार ऑनलाईन पद्धतीने शोधून संसार सुरू करून जीवन जगण्याचा विचार करणाऱ्यांनी अनेकांची फसवणुक झाल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. वाढत चाललेल्या फसवणूक प्रवृत्तींविरोधात आवाज उठवत, महिलांना सजगतेचा संदेश देण्यासाठी एका अनोख्या संमेलनाचे आयोजन वाशीत करण्यात आले आहे. ‘ऑनलाईन नवरा नको गं बाई…’ असे या संमेलनाचे नाव असून या संमेलनात ऑनलाईन विवाहसंस्थेतील गुन्हेगारीशी निगडित माहिती दिली जाणार आहे.
विवाहसंस्था ही मानवी जीवनात महत्वाची मानली जाते. वयानुसार आपल्यासाठी अनुरूप जोडीदार शोधला जातो. पुर्वीच्या काळी नातेसंबंधातून विवाह जमविले जायचे. मात्र, काळानुरूप यात बदल होत गेले. लग्न जमवण्यासाठी ऑनलाईन माध्यमे आली. ऑनलाईन माध्यमांवर आपली संपुर्ण माहिती देऊन अनुरूप स्थळाची निवड करण्यास सुरूवात झाली. मात्र, या ऑनलाईन विवाहसंस्थेमुळे गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
विवाहाच्या नावाखाली फसवणूकीचे प्रकार घडू लागले. या प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर मुद्दा झाला. याच गुन्हेगारीपासून महिलांना वाचवायला आणि त्यांच्यात सजगता, आत्मनिर्भरता आणि दक्षता निर्माण करण्यासाठी वाशीत एका अनोख्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नेत्रा एंटरप्रायझेसच्या वुई मुक्ता या बहुउद्देशीय व्यासपीठा अंतर्गत आणि स्विफ्ट डिटेक्टिव्ह अॅन्ड इन्व्हेस्टिगेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. यात ‘ऑनलाईन नवरा नको गं बाई…’ या विषयावर आधारित संमेलन पार पडणार आहे.
कुठे आणि केव्हा ?
हे संमेलन शनिवारी, १९ जुलैला सायंकाळी ४.३० ते ८.३० यावेळेत वाशीतील एम जी एम हॉस्पिटल जवळ सेक्टर ६ येथील साहित्य मंदिर येथे असणार आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी विनामुल्य असणार आहे. तर, स्पर्धेसाठी पुर्वनोंदणी अनिवार्य असून १६ जुलै अंतिम तारिख असणार आहे. अधिक माहितीसाठी ९३२६६०९८७२ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
संमेलनात होणार काय
ऑनलाईन नवरा नको गं बाई या संमेलनात ऑनलाईन विवाहसंस्था – गुन्हेगारीशी निगडीत माहिती दिली जाणार आहे. ही माहिती स्विफ्ट डिटेक्टिव्हज अँड इन्व्हेस्टिगेशन्सच्या संचालिका प्रिया काकडे देणार आहेत. तसेच नववधू फॅशन रॅम्प वॉक स्पर्धा देखील मुख्य आकर्षण असणार आहे.
संमलेनाचा उद्देश काय ?
समाजात प्रबोधन घडविण्याचा हेतूने याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना केवळ सजगच नव्हे तर आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रेरणा मिळावी, हाच या संमेलनाचा मुख्य उद्देश असणार आहे.