वर्षभरात ३५० कोटी रुपयांची भर
गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेने राबवलेल्या उत्पन्नवाढी मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले असून गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत महापालिकेच्या तिजोरीत यंदा ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेची भर पडली आहे.
गेल्या काही वर्षांत जमा-खर्चाचे गणित बिघडल्यामुळे ठाणे महापालिका आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. तसेच महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शहरातील विविध विकासकामे खोळंबली होती. गेल्या वर्षीपर्यंत महापालिकेची अशीच काहीशी अवस्था होती. यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत मिळणाऱ्या उत्पन्न वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात जयस्वाल यांनी ठरवून मोठय़ा विकास प्रकल्पांना कात्री लावली होती. मालमत्ता कर, पाणीवसुली आणि स्थानिक संस्था कराची प्रभावीपणे वसुली प्रशासनाने सुरू केली आहे. या वसुलीमुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली आहे. राज्य शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे पालिकेची आर्थिक घडी विस्कटू लागली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५० कोटींपेक्षा अधिक वसुली झाली आहे. महापालिका प्रशासनाने अन्य विभागांतून मिळणाऱ्या उत्पन्न वसुलीवर अधिक भर दिला. गेल्यावर्षी डिसेंबरअखेर महापालिकेच्या तिजोरीत ९०५.४५ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते, तर यंदाच्या वर्षी १२५६.०३ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत महापालिकेची कोलमडलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तिजोरीतील उत्पन्न वाढीमुळे शहरातील रखडलेले विविध प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
तीन महिन्यात आठशे कोटी वसुलीचे आव्हान..
यंदा १९९७.७६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करून त्यामध्ये विविध विभागांकडून १६८८ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले. मात्र, सर्वसाधारण सभेने चारशे कोटी रुपयांची वाढ केल्याने तो २३६९.७६ कोटी रुपयांपर्यंत गेला. त्यामध्ये विविध विभागांना २०२० कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. डिसेंबर अखेपर्यंत १२५६ कोटी रुपयांची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे. उर्वरित आठशे कोटींच्या रकमेची वसुली बाकी आहे.